अहिल्यानगर - विळद (ता.अहिल्यानगर) येथील डोंगरमाथ्यावर मेंढपाळाच्या पालावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ९ जून रोजी पिंप्री घुमट (ता.अहिल्यानगर) येथील मेंढपाळ पोपट होडगर हे कुटुंबासह शेतात झोपले असताना सात दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीचे दागिने जबरदस्तीने चोरले व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली होती.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले.
गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १५ जून रोजी पांढरीपुल येथे सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींमध्ये भैय्या काळे, ताराचंद भोसले, किसन उर्फ विजय काळे, नागेश भोसले व सोनुल भोसले यांचा समावेश आहे. त्यांनी विळद घटनेत गुन्हा केल्याची कबुली दिली असून इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालात १२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ मोबाईल व २ मोटारसायकलींचा समावेश आहे. आरोपींनी गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील मांजरी शिवारातही अशाच पद्धतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.
त्यानुसार तेथील गुन्हाही उघडकीस आला आहे. ही कारवाई पोसई तुषार धाकराव व पथकातील २० हून अधिक पोलिसांनी धडक तपास करून पार पाडली. अटक आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.