सांगली - अवयवदान चळवळीला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने ‘सांगली पॅटर्न’ तयार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. “मरावे परी अवयवरूपी उरावे” या भावनेतून नागरिकांनी अवयवदानाच्या दिशेने पावले टाकावीत, असे आवाहन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व मिरज तहसील कार्यालय येथे झाले.
राज्य शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये पुढील चार महिन्यांसाठी ऐच्छिक अवयवदान चळवळ राबवली जात आहे. यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून क्यूआर कोड सादर करण्यात आला असून, स्कॅन करून नागरिक ऑनलाईन प्रतिज्ञापत्र भरू शकतात.
या कार्यक्रमात डॉ. हेमा चौधरी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, तहसिलदार लीना खरात, अमोल कुंभार, अश्विनी वरूटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहाय्यक अधिकारी आकाश गालिंदे, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे यांनी स्वत: क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन नोंदणी करत अवयवदान चळवळीला सुरुवात केली. “दानाची खरी भावना ही गुप्तपणे दिलेल्या मदतीत असते. मृत्यूनंतरच्या काही तासांत अवयवदान शक्य असून, यात शरीराचा विद्रूपपणा होत नाही,” असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवदानही शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात 30 तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरून अवयवदानासाठी नोंदणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना प्रातिनिधिक प्रमाणपत्राचे वितरणही यावेळी करण्यात आले.