अहिल्यानगर - शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत, कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा कथित मोबाईल अॅप घोटाळा केला आहे. या कथित घोटाळ्यामुळे अनेक भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, या कथित घोटाळ्याच्या मागे देवस्थानच्या अधिकाऱ्यांचा आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांचा संभाव्य सहभाग असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.
विशाल सुरपुरिया यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवस्थानमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोबाईल अॅप घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी करत असताना जर देवस्थानचे अधिकारी व विश्वस्त मंडळ आपले पदे राखत राहिले, तर पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे.
त्यांचा स्पष्ट आरोप आहे की, घोटाळ्याला छुपे समर्थन मिळाल्याशिवाय हे सर्व शक्य झाले नाही. त्यामुळे, या प्रकरणात चौकशी पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आणि गुन्हा दाखल होईपर्यंत शनैश्वर देवस्थानच्या कमिटी, अधिकारी व विश्वस्त मंडळाला तातडीने स्थगित किंवा बरखास्त करणे आवश्यक आहे.
सुरपुरिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की, शासनाने योग्य व कर्तव्यदक्ष अधिकारी शनैश्वर देवस्थानचे प्रशासक म्हणून नियुक्त करून सर्व अधिकार त्या अधिकाऱ्यांना दिले जावेत, जेणेकरून या घोटाळ्याची चौकशी योग्य पद्धतीने होईल आणि दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करता येईल.
या प्रकरणी संबंधितांची चौकशी आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून देवस्थान अॅप प्रकरणामुळे वादात सापडलेले आहे.