मनोरंजन : 'शातीर द बिगिनींग' हा आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट १३ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले आहे. आतापासूनच या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
या सिनेमाची निर्मिती रेश्मा वायकर यांच्या श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली झाली आहे. चित्रपटाची कथा कॉलेजमधील अंमली पदार्थांच्या व्यसनावर आधारित असून, त्यातून समाजातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आलेले आहे.
या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट महिला प्रधान सस्पेन्स थ्रिलर म्हणून ओळखला जात आहे. या भूमिकेतून त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरवर, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, अॅड. रामेश्वर गिते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांसारखे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाच्या 'पोरी आम्ही मराठी पोरी' या गीताला किल्ले रायगडावर २०० कलाकारांच्या सहभागाने चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे.
'शातिर द बिगिनींग' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, त्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट समाजातील गंभीर विषयावर भाष्य करत, मनोरंजनासोबतच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे.