अहिल्यानगर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक ६ जून रोजी खंडाळा येथील हॉटेल राजयोग येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री मिळाल्यानंतर छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
संबंधितांवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे आदेश सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या टीममध्ये पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अरुण गांगुर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, भगवान थोरात, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की, अक्षय अनिल कर्डिले (वय २८, रा. खंडाळा, ता. अहिल्यानगर) हा हॉटेल राजयोग येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे (AHTU, अहिल्यानगर) यांना कळवून त्यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत नारायण ठाणप्रसाद भटुराई (वय २७, रा. कोहलपूर, ता. कोहलपूर, बाके, नेपाळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दीड हजार रोख जप्त करण्यात आले.
हॉटेलमधील खोलीत 3 महिला सापडल्या. चौकशीत त्यांनी अक्षय कर्डिले याने वेश्याव्यवसायासाठी त्यांना आणल्याचे सांगितले. ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातले काही पैसे महिलांना देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित महिलांची तात्काळ सुटका करण्यात आली.
त्यानंतर आरोपी अक्षय कर्डिले यास शोधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल सारिका दरेकर (नेमणूक : स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन येथे पिटा कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
ही संपूर्ण कारवाई प्रशांत खैरे (अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर) व अमोल भारती (अति. कार्यभार नगर ग्रामीण उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.