अभिनंदन ! प्रा. विजय शिंदे ‘महाराष्ट्र शिक्षा भूषण’ पुरस्काराने सन्मानित


अहिल्यानगर : आयडीवायएम फाउंडेशन व इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र शिक्षा भूषण 2025’ या भव्य सोहळ्यात अहिल्यानगर येथील प्रा. विजय शिंदे यांना प्रतिष्ठेच्या 'महाराष्ट्र शिक्षा भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार 'चेतना पब्लिकेशन'चे विभागीय संचालक राज शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी स्नेहालय शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी, विवेकानंद स्कूलच्या कांचन पापडेजा, तसेच अजय चौबे उपस्थित होते.

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व विविध उपक्रमांद्वारे समाजाचा विकास करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

प्रा. शिंदे यांनी 'डॉ. शरद कोलते इंग्लिश मीडियम स्कूल, पारगाव' या संस्थेमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यांनी शेतकरी, महिला व युवकांसाठी आरोग्य शिबिरे, उद्योजकता मार्गदर्शन, वृक्षारोपण अभियान यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. येत्या काळात शाळेत 'सौ. वैशाली कोलते कौशल्य विकास केंद्र' सुरू करण्यात येणार असून त्यामार्फत स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.

'डॉ. नितीन कोलते' यांनी शाळेला 'चिंचा फोडणी यंत्र' डोनेट केले असून त्यातून होणारे उत्पन्न शाळेच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. ही सर्व कार्ये पुरस्कार निवड प्रक्रियेत महत्त्वाची ठरली.

सध्या प्रा. विजय शिंदे हे अहिल्यानगर शहरात आयएमएस (IMS) व्यवस्थापन संस्था येथे 'सहाय्यक प्राध्यापक' म्हणून कार्यरत असून, तेथेही शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

या सन्मानाबद्दल संस्थेचे संचालक डॉ. एम. बी. मेहता, उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, विभागप्रमुख डॉ. प्रोनोती तेलोरे, माजी सरसंचालक डॉ. शरद कोलते, निवृत्त महसूल अधिकारी शिवाजी टेमकर, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच वसंत दिवटे, उद्योजक शहाजी मोरे यांनीही हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनीही हा गौरव अभिमानाने साजरा केला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !