मुंबई - शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींनंतर आता धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी या प्रकरणात स्वतःहून (Suo Motu) कारवाई सुरू केली आहे. देवस्थानचे विश्वस्त यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
धर्मादाय आयुक्तांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 मधील कलम 41D अंतर्गत हे प्रकरण उघडले आहे. प्राप्त माहितीनुसार, देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळून आल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई पुढे आली आहे. विश्वस्त यांना 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता धर्मादाय आयुक्त कार्यालयात मुंबई येथे प्रत्यक्ष किंवा त्यांचे वकील मार्फत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपस्थित राहून त्यांनी या प्रकरणासंबंधित आपले म्हणणे व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, जर विश्वस्त हे नमूद दिवशी अनुपस्थित राहिले, तर प्रकरणाची सुनावणी त्यांच्या अनुपस्थितीत केली जाईल, असा स्पष्ट इशारा धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे.
या कारवाईमुळे श्री शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये पारदर्शकता आणि शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक भाविकांमध्येही यामुळे चर्चा सुरु झाली असून, या प्रकरणाचा पुढील तपशील आणि अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.