एका राजाने जंगलात फिरताना एका सुंदर युवतीला पाहिले. तिला पाहताक्षणीच त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम दाटले. तिच्या वडिलांची संमती घेऊन तो तिच्याशी लग्न करतो आणि तिला महालात राणी म्हणून वागवतो. सौंदर्य, वस्त्रे, दागदागिने, संपत्ती… सगळं काही तिला देतो.
पण तरीही ती राणी उदास असते. राजाला याचे आश्चर्य वाटते. तो आपल्या प्रधानाला विचारतो, “इतकं सगळं असूनही माझी राणी दु:खी का?” प्रधान शोध घेतो आणि जंगलातील एका वृद्धेला भेटतो.
ती म्हणते, “महाराज, स्त्रीला केवळ ऐश्वर्याची गरज नसते. तिला हवं असतं ते प्रेमासोबत मिळणारं स्वातंत्र्य आणि सन्मान. जिथे ते मिळतं, तिथेच तिचं खरं बहरणं होतं.” ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच खरी आहे.
सीतेजवळ सगळं होतं, पण तिने कधीच भौतिक गोष्टींची अपेक्षा ठेवली नव्हती. तिला हवं होतं ते केवळ सन्मान. आजही समाजात अनेक स्त्रिया फक्त प्रेमावर नाही, तर प्रेमात मिळणाऱ्या सन्मानावर जगतात. पण दुर्दैवाने, लग्नानंतर तिच्या आयुष्यातील अनेक अधिकार आणि स्वप्नं हरवत जातात.
स्त्रीला फक्त तिच्या सासरच्या घरातली जबाबदारी उरते. पण तिच्या जन्मदात्या आईवडिलांविषयी तिचं ममत्व, कर्तव्य, या सगळ्यांची समाजाने किंमत का ठेवू नये? मुलीच्या आईवडिलांशी ‘आमचा काय संबंध?’ असे म्हणणे, हे अन्यायकारक आहे.
भारतीय संस्कृतीत ‘आदर्श बहू’ म्हणून ज्या कल्पना निर्माण झाल्या आहेत, त्या वास्तवात स्त्रीच्या अस्तित्वाला दुय्यम मानतात. तिच्या स्वतःच्या स्वप्नांना आणि गरजांना फारसा वाव दिला जात नाही.
विवाहानंतर स्त्रीचं नाव, घर, ओळख सगळं बदलून जातं. तिचं पूर्ण आयुष्य नव्याने सुरू होतं, पण पुरुषाच्या आयुष्यात मात्र फारसा फरक पडत नाही. पुरुष सत्ताक मानसिकतेत अजूनही ‘घरजावई’ होणं कमीपणाचं मानलं जातं. पण आता हे बदलायला हवं.
घर हे दोघांचं असतं 'पती आणि पत्नीचं'. सुखदु:ख कोणत्याही प्रसंगी दोघांनीही एकमेकांना साथ द्यायला हवी. वडीलधाऱ्यांनी फक्त सल्ला द्यावा, मदतीची गरज भासली तर हातभार लावावा, पण निर्णय घेण्याचा हक्क दोघांचा असावा.
स्त्री सबलीकरणाच्या चर्चा आपण करतो, पण त्या केवळ चर्चांपुरत्याच राहतात. प्रत्यक्षात स्त्रियांना स्वातंत्र्य आणि सन्मान मिळतो आहे का, हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
कुटुंब संस्था टिकवायची असेल, तर जुनाट विचार झटकून नवा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. स्त्री आणि पुरुष यांच्यात समानता आणि परस्पर सन्मानाची भावना रुजवली गेली, तरच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल.
आता तरी जागे व्हायला हवे. अन्याय करणाऱ्या संस्कृतीला निरोप देऊन, सन्मान आणि स्वातंत्र्य देणाऱ्या नव्या संस्कृतीकडे पावलं टाकू या.!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

