अहिल्यानगर – भारतीय हरितक्रांतीचे जनक व ख्यातनाम कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. स्वामीनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी कुंभकोणम, तामिळनाडू येथे झाला होता. भारताच्या अन्नसुरक्षेसाठी त्यांचे कार्य अतुलनीय असून त्यांनी वनस्पतीशास्त्र, अनुवंशशास्त्र व सायटोजेनेटिक्स या विषयांमध्ये मोठे योगदान दिले.
भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच जागतिक अन्न पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक आमदार शिवाजीराव कर्डिले, संचालक युवा नेते अक्षय कर्डिले, प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव, आयक्यूएसी प्रमुख डॉ. आर. एच. शेख, मराठी विभाग प्रमुख डॉ. बी. एम. मुळे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. स्वाती वाघ, राजेश गाडेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. स्वाती वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मनीषा पुंडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अंकिता खोमणे यांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "आपल्या वाढदिवशी एक झाड लावा आणि त्याचे संवर्धन करा" असे आवाहन केले.
तसेच ‘एक झाड महाविद्यालयासाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.