अहिल्यानगर : महाराष्ट्र व गोव्यातील वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी व न्यायालयीन व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविण्यासाठी मी ठोस प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन महाराष्ट्र अँड गोवा एडवोकेट्स बार कौन्सिलचे नवे चेअरमन ॲड. अमोल सावंत यांनी दिले.
अहिल्यानगर येथे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त ॲड. विक्रम वाडेकर यांच्या हस्ते तसेच ॲड. पंकज खराडे, ॲड. सागर वाव्हळ, ॲड. प्रसाद गर्जे व ॲड. प्रल्हाद खंडागळे हे उपस्थित होते.
यावेळी सावंत यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी यावेळी बोलताना वकिलांचे हित जपणारे ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. विशेषत: 'वकील संरक्षण कायदा' तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली.
या संदर्भात सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “ही मागणी न्याय्य असून याबाबत लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल,” असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांच्या सुरक्षेसाठी, व्यावसायिक सन्मानासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहे.
वकिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. वकिलांच्या हक्कांच्या चळवळीत सावंत यांच्या नेतृत्वामुळे नवा ऊर्जावान टप्पा सुरू होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.