अहिल्यानगर : श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या औचित्याने ग्रंथालय विभागाच्या वतीने आकर्षक ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी हिंदी विभाग प्रमुख व आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. एच. आर. शेख, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब मुळे यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथपाल प्रा. ए. एस. दळवी यांनी डॉ. रंगनाथन यांचे जीवनकार्य व ग्रंथालय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान यावर भाष्य केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले की, वाचन हे केवळ ज्ञानार्जनाचे साधन नसून जीवनभर पुरणारी शिदोरी आहे.
वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते, भाषिक कौशल्य विकसित होते व जगाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक बनते. यावेळी प्राचार्य डॉ. जाधव यांनी स्वतःची स्वप्रकाशित पुस्तके ग्रंथालयास भेट दिली.
तर विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. वाघ एस. जी. व प्रा. राऊत पी. एस. यांनीही काही पुस्तके ग्रंथालयास भेट स्वरूपात अर्पण केली. संस्थेचे संस्थापक आमदार शिवाजीराव कर्डिले व संचालक युवा नेते अक्षय कर्डिले यांनी ग्रंथपाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
ग्रंथप्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे या कार्यक्रमाला यशस्वीतेची परंपरा लाभली.
