अहिल्यानगर - नेवासे तालुक्यातील वडुले गावातील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपवली. एका व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
![]() |
| अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब सरोदे |
आपली जीवनयात्रा संपवण्यापूर्वी त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपली हतबलता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दुर्दैवी घटनेला चार दिवस होऊन गेले तरीही प्रशासनातील अधिकारी किंवा राजकीय नेत्यांनी शोकसंतप्त कुटुंबाला भेट देण्याची तसदी घेतली नाही, असे परिसरात म्हटले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांवर आणि त्यांच्या संकटांवर सरकारचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांचा जीवन संघर्ष इतका कठीण बनला आहे की ते कर्जबाजारीपणामुळे आपल्या जीवनयात्रेची समाप्ती करण्याची वेळ आली, असे आता म्हटले जात आहे.
आपल्या जाण्यानंतर तरी सरकारने कर्जमाफी द्यावी, असे आवाहन सरोदे यांनी व्हिडिओद्वारे केले आहे. अन्नदात्यांच्या या दुःखाकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष आणि स्थानिक गावकऱ्यांच्या वतीने वडुले गावात शेतकऱ्याच्या मृत्यूस न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी आज गावात निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दीर्घकालीन उपाययोजना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
![]() |
| सोशल मीडियावर केलेले आवाहन |


