डोंगरदऱ्यांतून शिक्षणाचा प्रकाश ! अकोले तालुक्यात १७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


अहिल्यानगर - पश्चिम अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या कुमशेत परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शनिवार, २६ जुलै रोजी एक वेगळाच उत्सव अनुभवायला मिळाला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक सहाय्यता समूहाच्या वतीने आयोजित 'एक कदम… कलम से कलाम की ओर' या विशेष उपक्रमांतर्गत तब्बल १७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

मुसळधार पावसात वाहणारे ओढे, चिखलमय डोंगरी रस्ते आणि पुरात अडकलेलं साहित्य... या सर्व अडचणींवर मात करत स्वयंसेवक पहाटे ३ वाजता निघाले आणि डोंगर-दऱ्या ओलांडत शिक्षणाचा प्रकाश घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले.

या उपक्रमांतर्गत घोडेवस्ती, पाटीलवाडी, कळकीची वाडी, कुमशेत गावठाण, उंबरवाडी, देवाची वाडी (शिरपुंजे), चिल्हारवाडी, खडकवाडी, देवीची वाडी (लाडगाव) आणि मोहंडुळवाडी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डॉ. कलाम प्रेरित स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास यांसह अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

त्या छोट्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि बॅग उघडताना उमटलेलं निरागस हास्य हेच या उपक्रमाचं खऱ्या अर्थाने यश होत. 'माझ्याकडे आता स्वतःची बॅग आहे !' असे आनंदाने सांगणारे चेहेरे पाहून स्वयंसेवकांची मेहनत सार्थ ठरली.

शाळांतील शिक्षकांचंही उपक्रमात मोलाचं योगदान राहिलं. सावळेराम पिचड, हरिबा चौधरी, बाळासाहेब बांबळे, रंजना शिंदे, यशवंत गिऱ्हे, गोरख पथवे, उषा लोहकरे, बाबासाहेब कुदनर आदी गुरुजनांनी समन्वय आणि वाटप प्रक्रियेत मनापासून मदत केली.

विशेषतः भाऊसाहेब कासार सर यांनी संपर्क व मार्ग नियोजनात महत्त्वाची भूमिका निभावली. चौधरी सर, पिचड सर आणि दोरगे सर हे स्वयंसेवकांना डोंगराळ मार्गात मार्गदर्शक ठरले.

या उपक्रमासाठी आर्थिक पाठबळ मिळाले बीसीएस/एमसीएस २००१/०३ माजी विद्यार्थी ग्रुप, आयटी फ्रेंड सर्कल आणि ‘नगरी फॉर नेचर’ ग्रुपकडून. त्यांच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम शक्य झाला, असे उद्धव टेमकर यांनी सांगितले.

राजूर येथील प्रेमळ स्वागत, उबदार चहा आणि गावच्या मातीतलं जेवण या सर्व अनुभवांनी हा शैक्षणिक उपक्रम केवळ मदतीचा नव्हे, तर माणुसकीचा खरा साज चढवला.

शेवटी 'आपण काही तरी दिलं… पण खूप काही मिळवून आलो.' विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतले समाधान आणि शिक्षकांचा खांद्यावरून दिलेला प्रेमळ हात, हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !