खरंतर दूरध्वनी असो भ्रमणध्वनी असो, यात बोलायचे शिष्टाचार असतात. आपण एखाद्याला फोन केला तर हे शिष्टाचार पाळतो का ? समोरच्याला उबग येईल असे आपण वागत नाही ना ?
कामाविषयी बोलत असताना त्यात वैयक्तिक विषय आणून विषयांतर करत नाही ना ? हे प्रश्न स्वतःला विचारत रहायला हवं..
फोन केल्यानंतर वयाने आपल्या पेक्षा मोठे असतील तर त्यांना अभिवादन करावे. आपल्याला आता बोलायला वेळ आहे का असं नम्रपणे विचारावे. काम असेल तर त्या कामावर फोकस करून संवाद साधावा.
उगाचच नमनाला घडाभर तेल... असं करू नये. कारण समोरच्या व्यक्तीला महत्त्वाचे काम असू शकते. काही व्यक्ती तरी अनोळखी असतात आणि उगाच 'Hi' असं पाठवतात.. मग आपणच विचारायचे कोण आपण..इ.इ. अशा व्यक्तींची व्यस्त माणसाला चिड येते.
काहीना खूप दिवसांनी फोन करून उगाचच खि खि करत ओळखला का?ओळखा मी कोण? अशी गंमत करायची सवय असते... मला अशा लोकांना काय फेकून मारलं तर फोनमधून जाऊन लागेल असा हिंसक विचार मनी येतो.
आपलं म्हणणं थोडक्यात मांडा, समोरच्या व्यक्तीच्या वेळेला महत्त्व द्या. उगाच तेच तेच गुऱ्हाळ गाळू नका, समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्या.. फोन करताना स्वर गुर्मीचा अजिबात नको.
सार्वजनिक ठिकाणी खाजगी गप्पा मोठ्याने मारु नका, आवश्यक असेल हळू बोला. कुणाचा मिस कॉल असेल तर नंतर आवर्जून फोन करा.. किंवा कामात असाल तर मी आपल्याला नंतर फोन करेन असा मेसेज द्या.
फोनवरचे बोलणे संपवले की आपल्याशी बोलून छान वाटले, पुन्हा बोलू.. असं विनम्रपणे बोलून निरोप घ्या. सर्वांचीच वेळ फार मुल्यवान आहे, अगदी तुमची सुध्दा. उगाच फोनवर गप्पा छाटत बसू नका. बघा पटतंय का? नाही पटलं तर चालू दे वेळेचा अपव्यय.!
आपण पाश्चिमात्य लोकांचे खूप नको ते अनुकरण करतो. आवश्यक गोष्टीत अनुकरण करत नाही.. त्यामुळे हे आपण शिकायला हवं.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)