अहिल्यानगर - रेसिडेन्शिअल हायस्कूल, अहिल्यानगर या शाळेत १९९० - ९१ ते १९९५ - ९६ या कालावधीत इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तेमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी १३ जुलै रोजी स्नेहमेळावा झाला.
या निमित्ताने प्रेरणादायी उपक्रम राबवत या बॅचने उत्कृष्ट दर्जाचे १० सिलिंग फॅन शाळेला भेट म्हणून दिले. शाळेचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांच्याकडे हे फॅन सुपूर्द करत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्राचार्य विजयकुमार पोकळे म्हणाले, की, रेसिडेन्शिअल हायस्कूल या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत असतात याचा आम्हाला कायम अभिमान वाटतो.
आपल्या माध्यमिक शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपण जो आदर्श पायंडा पाडला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे. शाळेसोबत असलेले आपले ऋणानुबंध आपण कायम ठेवावेत. शाळेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन पोकळे यांनी केले.
यावेळी १९९० - ९१ ते १९९५ - ९६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी मृणाल ठुबे, अविनाश कराळे, सचिन ठोसर, राम नळकांडे, प्रशांत जगताप, आनंद सिसोदिया आणि अनिता भगत या माजी विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी अविनाश कराळे यांनी मनोगत व्यक्त करताना, अनेक विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थलांतरित व्हावे लागते तरीही शाळेप्रती असणारे प्रेम व स्नेह त्यांच्या मनात कायम असतो.
आम्ही सर्वजण आज चांगल्या ठिकाणी पोहोचलो आहोत. कुणी चांगल्या नोकरीत तर कुणी स्वतःचा व्यवसाय उत्तम प्रकारे करत आहे. आज २९ वर्षांनी शाळेत आल्यानंतर शिक्षकांसमोर उभे राहिल्यानंतर छातीत धडधड झाल्याशिवाय राहत नाही.
आज व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वजण भेटत असले तरीही शाळेची भिंत, फळा, शिक्षकांनी लावलेली शिस्त या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. आज आम्ही जे काही आहोत त्याचे सर्व श्रेय या शाळेला जाते.
आमच्या बॅचने आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो या सद्भावनेतून शाळेला 'गेट-टूगेदर' च्या माध्यमातून जी काही भेट दिली ती भेट गुरुदक्षिणा दिल्यासारखी आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना शाळेतील सध्याचा बदल पाहून खूप आनंद होतोय, अशा भावना कराळे यांनी व्यक्त केल्या.
या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार पोकळे, पर्यवेक्षक भाऊसाहेब पवार, शरद सोनवणे, उपमुख्याध्यापिका जयश्री दरे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी केले. तर आभार मृणाल ठुबे यांनी मांडले.