शेवगाव (अहिल्यानगर) - येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गेली पन्नासहून अधिक वर्षे सातत्याने आयोजित केली जात असलेली टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा, म्हणजे उद्याचे वक्ते आणि श्रोते घडवणारी कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी केले.
टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी महात्मा वाचनालयाच्या वतीने त्यांचा अध्यक्ष रमेश भारदे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
इयत्ता आठवी ते दहावी या मोठ्या गटात पृथ्वीराज पोटफोडे याने प्रथम, ओंकार दारकुंडे याने द्वितीय तर अथर्व नजन याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. नंदन नांगरे, वेदिका शेकडे व वेदांती जोशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटात बोडखे ऋग्वेद याने प्रथम, स्वरा दहीफळे हिने द्वितीय तर प्रशांत वावरे याने तृतीय क्रमांक मिळवला. दिव्या निजवे, श्रावणी मरकड, प्रगती निकाळजे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. दोन्ही गटात मिळून ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
परीक्षक म्हणून हरिभाऊ नजन, सुधीर आपटे व कातकडे यांनी काम पाहिले. विजेत्यांना स्वातंत्र्यसैनिक कै. महादेव देवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सचिव हरीश भारदे उपाध्यक्ष डॉ ओंकार रसाळ, निलेश मोरे यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती होती.