येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना व श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हाणनगर (Baneshwar College) यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळे दत्तक योजना अंतर्गत “किल्ले संवर्धन” या विषयावर जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा ऐतिहासिक भुईकोट किल्ला (Bhuikot Fort) येथे पार पडली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. अमोल बुचुडे (राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर Radhabai Kale College) यांनी किल्ल्याची सखोल ऐतिहासिक माहिती (Historical Information) स्वयंसेवकांना दिली. किल्ल्याशी संबंधित ऐतिहासिक घटना कथन करत त्यांनी स्वयंसेवकांसमोर त्या काळातील काल्पनिक चित्र उभे केले.
दुसऱ्या सत्रात प्रा. भरत होळकर (न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) यांनी “किल्ले संवर्धन काळाची गरज” या विषयावर संवाद साधला. “किल्ले हे शौर्य, रणनीती आणि स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे जतन करणे म्हणजे आपला इतिहास जपणे होय,” असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले.
तिसऱ्या सत्रात किल्ला निरीक्षण (Fort Visit), गटचर्चा (Group Discussion) तसेच प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. या सत्रामध्ये स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. चौथ्या सत्रात समारोपप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना उपस्थिती प्रमाणपत्रांचे (Certificate) वितरण करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबाबत आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यशाळेसाठी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक लि.चे अक्षय कर्डिले यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सागर कोहक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. इत्तीसाम पठाण यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकारी प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब मुळे, डॉ. राजमोहम्मद शेख, प्रा. विठ्ठल कडूस, प्रा. ऋषिकेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. या जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

