येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर – “लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला बदल आधी स्वतःमध्ये घडवावा लागतो. आजच्या राजकारणाचे विदारक चित्र बदलण्यासाठी सामान्य नागरिकांनीच सत्तेची चावी हातात घेणे काळाची गरज आहे,” असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) जिल्हाध्यक्ष योगेश साठे (Yogesh Sathe) यांनी केले.
पारनेर (Parner) तालुक्यातील हंगा (Hanga) येथे वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) नूतन शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे होते. यावेळी साठे यांनी आक्रमक भूमिका घेत आगामी जिल्हा परिषद निवडणुका (Elections) वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv Prakash Ambedkar) आणि सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर वंचित बहुजन आघाडीला मोठे यश मिळत आहे. आपण व्यवस्थेला आणि नेत्यांना दोष देतो, मात्र लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी जागृत होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी हंगा शाखेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शाखा अध्यक्षपदी गणेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून, सदस्य म्हणून किरण बर्डे, रोहिदास सूर्यवंशी आणि पुनीत आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा सल्लागार जे. डी. शिरसाठ, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर, नेते फैरोज पठाण, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राहुल घंगाळे, दीपक गायकवाड, राजेंद्र करंदीकर, आरपीआयचे राजू उबाळे, संतोष अडसूळ, अनंत श्रीमंडलीकर, विजय साळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज सूर्यवंशी यांनी मानले. हंगा येथे शाखा कार्यान्वित झाल्याने पारनेर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळकटीस मोठी चालना मिळाल्याचे चित्र आहे.

