येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - भारताच्या प्रजासत्ताक (Republic Day) दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी (Urdu Literature) व अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक मुशायरा (Mushaira) व ऐतिहासिक काव्य महोत्सव ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ (Jashn e Hindustan) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या मानाच्या साहित्यिक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत शायरांना आमंत्रित करण्यात आले असून, नगरच्या सुप्रसिद्ध उर्दू शायरा (कवयित्री) डॉ. कमर सुरूर (Dr. Qamar Surur) यांनाही विशेष सन्मानाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
डॉ. कमर सुरूर उर्दू साहित्यातील अभ्यासपूर्ण लेखनशैली, आशयघन कविता (Poetry) आणि प्रभावी सादरीकरण यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या उपस्थितीमुळे या मुशायऱ्याची शान निश्चितच अधिक वाढणार आहे. त्यांच्या कवितांमधून सामाजिक संवेदना, स्त्री-अभिव्यक्ती, मानवी मूल्ये आणि देशप्रेम (Patriotism) यांचे प्रभावी दर्शन घडते.
साहित्य, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम यांचे सुंदर संमेलन असलेला हा काव्य महोत्सव २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) या ऐतिहासिक स्थळी होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा कार्यक्रम उर्दू साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. देशाच्या विविध भागांतून रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. कमर सुरूर यांना मिळालेले हे निमंत्रण नगरच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, त्यांच्या सहभागामुळे अहिल्यानगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा उजळणार आहे.
