धक्कादायक ! कमरेला गावठी पिस्तुल, खिशात जिवंत गोळ्या, संग्राम जगतापला अटक


मिरजगाव (अहिल्यानगर) - जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मिरजगाव परिसरात एक मोठी कारवाई केली आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव शिवारात एका तरुणाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. मिरजगाव-कर्जत शिवारातील क्रांतिसूर्य महात्मा फुले पुलाखाली एक तरुण संशयास्पद रित्या विनापरवाना गावठी कट्टा घेऊन थांबला होता.

बातमी मिळताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजगाव पोलिसांची मदत घेऊन परिसरात सापळा रचला. यावेळी पुलाखाली दबा धरून बसलेल्या संशयित तरुणाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

झडती घेतली अन् पोलीसही चक्रावले! पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संग्राम सुनील जगताप (वय २३, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) असे असल्याचे सांगितले. जेव्हा पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली, तेव्हा त्यांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले.

आरोपीकडून:
  • ३५ हजार रुपये किमतीचे १ गावठी पिस्टल (अग्निशस्त्र)
  • ३ हजार रुपये किमतीची ३ जिवंत काडतुसे
  • एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल, तपासाचे चक्र फिरले - या प्रकरणी पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणेकर तरुण एवढ्या लांब शस्त्र घेऊन कोणाच्या शिकारीसाठी किंवा कोणत्या गुन्ह्याच्या उद्देशाने आला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

या पथकाने केली यशस्वी कारवाई : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

पुण्यातून मिरजगावला शस्त्र घेऊन येण्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता याच्या मुळापर्यंत पोहोचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !