अहिल्यानगर - जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील तरडगाव फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाडसी कारवाई करत ९.८५४ किलो ग्रॅम गांजा (Narcotics) जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात पकडले आहे.
त्यांच्याकडून एकूण ३ लाख ४६ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक खर्डा (Kharda) परिसरात गस्त घालत होते.
यावेळी एका इसमाकडे हिरो सीडी डिलक्स मोटारसायकलवरून (क्र. MH-16 B-2550) मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. ही माहिती मिळताच पथकाने खर्डा पोलिसांच्या मदतीने तरडगाव फाटा येथे सापळा रचला.
पोलिसांची झडती आणि आरोपींची कबुली - संशयास्पद मोटारसायकल समोरून येताना दिसताच पोलिसांनी तिला अडवले. दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील गोणीमध्ये उग्र वास येणारा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला.
त्यांची नावे याप्रमाणे -
- सचिन नवनाथ गायकवाड (वय २५, रा. पिंपरखेड)
- सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे (वय २३, रा. खर्डा)
हा माल त्यांनी सुभम घुंगरे (रा. माहीजळगाव, कर्जत) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून, सध्या घुंगरे फरार आहे.
पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे :
- गांजा : ९.८५४ किलो
- किंमत :२,४५,४७५ रुपये
- दुचाकी : हिरो सीडी डिलक्स
- किंमत : ७०,००० रुपये
- मोबाईल : २ नग
- किंमत ३०,००० रुपये
- रोख रक्कम : १,००० रुपये
- एकूण किंमत : ३,४६,४७५ रुपये
या प्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खर्डा पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वी केली आहे.
