अभिमानास्पद ! वैष्णवी घोडके आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकली

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - नगरच्या मातीत घडलेल्या गुणी अभिनेत्री वैष्णवी संजय घोडके (Vaishnavi Sanjay Ghodke) हिच्या अभिनयाने सजलेला ‘सोहळा’ (Sohala) हा चित्रपट (Marathi Movie) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिष्ठित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF 2026) मध्ये ‘सोहळा’ची अधिकृत निवड आहे.

हा महोत्सव १५ ते २२ जानेवारी दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. यासह अजंठा–एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Film Festival) यांसारख्या नामांकित महोत्सवांतही या चित्रपटाने आपली छाप पाडली आहे.

यापूर्वी मुंबईत पार पडलेल्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्येही ‘सोहळा’ला मानाची दाद मिळाली होती. एका शेतकरी कुटुंबाच्या संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटात वैष्णवीने साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘सोहळा’चे दिग्दर्शन साईकत बागबान यांनी केले असून, या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटाचे लेखन साईकत बागबान, आशुतोष बालसेकर, आदित्य गावडे आणि अनुपम यांनी केले असून निर्मिती सचिन श्रीवास्तव यांच्या कॅरी ऑन फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे.

या सिनेमात वैष्णवीसोबत देवदत्त घोणे, प्रवीण डाळिंबकर, वर्षा सुनील अजित आणि अलेस्सांड्रा व्हेलन प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. कोणतीही कलाक्षेत्रातील पार्श्वभूमी नसतानाही वैष्णवीचा कलाप्रवास लहानपणापासूनच घडत गेला. महर्षी ग. ज. चितांबर कन्या विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेत बाल एकांकिका आणि आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धांतून तिने अभिनयाची ओळख निर्माण केली.

पेमराज सारडा महाविद्यालय (Pemraj Sarda College) येथे शिक्षण घेताना विविध आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला. निर्मिती रंगमंच (Nirmiti Rangmanch) या नाट्यसंस्थेमार्फत कोंडवाडा, ड्रायव्हर, वारुळातली मुंगी यांसारख्या एकांकिका व दीर्घांकांद्वारे तसेच राज्य नाट्यस्पर्धांमध्ये तिने अभिनयातील पुरस्कार पटकावले.

पुढे पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून (Lalit Kala Kendra) नाट्यशास्त्रातील पदवी पूर्ण करून तिने मुंबईची वाट धरली. मुंबईत ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे (Waman Kendre) यांच्या दिग्दर्शनाखालील ‘गजब तिची अदा’ या व्यावसायिक नाटकातून तिला महत्त्वाची संधी मिळाली.

वैष्णवीने प्रमुख भूमिका साकारलेला ‘We, The Puffcorns of India (आम्ही, भारताचे मुरकुल)’ हा लघुपट कलकत्ता पीपल्स फिल्म फेस्टिवल 2026मध्ये निवडला गेला असून, याच लघुपटासाठी तिला यापूर्वी ७वा अण्णाभाऊ साठे लघुपट महोत्सव, पुणे आणि यशवंत फिल्म फेस्टिवल, मुंबई येथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या लघुपटांतील भूमिका लक्ष्यवेधी :
  • सेम टू सेम - वास्तववादी अभिनय
  • आक्रांत - प्रभावी सादरीकरण
  • दुबार पेरणी - शेतकरी जीवनातील संघर्ष
  • फोडणीची पोळी - सशक्त अभिनय
  • म्हसनातलं सोनं – ठसठशीत भूमिका

सध्या सन मराठी (Sun TV Marathi) वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकत असून, यापूर्वी धोंडी, मिसेस अंबरेला, विद्यापीठ, सजणा या चित्रपटांमध्ये तसेच तुझं माझं जमतंय, घेतला वसा टाकू नको, दार उघड बये, सोन्याची पावलं या मालिकांमधूनही तिने प्रभावी अभिनय केला आहे.

लघुपट, नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या सर्व माध्यमांत सातत्याने आपला ठसा उमटवत वैष्णवी घोडके आज नगरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उज्ज्वल करत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !