पक्षशिस्तीला तडा । युवा सेनेच्या जिल्हा व शहरप्रमुखांची शिवसेनेतून हकालपट्टी

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shiv Sena Eknath Shinde) पक्षाच्या अधिकृत आदेशाला डावलून महापालिका निवडणुकीत इतर पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्याप्रकरणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे (Akash Katore) व युवा सेना शहरप्रमुख महेश लोंढे (Mahesh Londhe) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई शिस्तभंगाच्या कारणावरून करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे (Anil Shinde) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शिवसेनेत अधिकृत पदावर कार्यरत असताना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात इतर पक्षाकडून उमेदवारी दाखल करणे हे थेट पक्षशिस्तीचे उल्लंघन असल्याचा ठपका संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची तात्काळ पदनियुक्ती रद्द करण्यात येत असून, त्यांना शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे (Anil Shinde) यांनी स्पष्ट केले.

पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाप्रमुख शिंदे यांनी दिला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची अधिकृत भूमिका, उमेदवार व निर्णय यांच्याशी प्रामाणिक राहणे हे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याचे कर्तव्य असून, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांसाठी शिवसेनेतस्थान नसल्याचे त्यांनी सांगितले.

या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षशिस्तीबाबत अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !