अहिल्यानगर - आपल्या घराच्या कोपऱ्यात, गॅलरीत किंवा पार्किंगमध्ये कित्येक दिवसांपासून धुळ खात पडलेली ती जुनी सायकल आठवतेय? कदाचित तुमच्यासाठी ती आता फक्त एक अडगळ असेल, पण कोणा एका गरजू विद्यार्थ्यासाठी ते 'शाळेचं स्वप्न' पूर्ण करणारं साधन ठरू शकतं.
वाडी-वस्तीवर राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी आरोग्यम बहुउद्देशीय फाउंडेशन सरसावले आहे. त्यामुळे 'शाळा जवळ करण्यासाठी' एक पाऊल पुढे टाका.
अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील नागरिकांसाठी आरोग्यम फाउंडेशनने 'एक हात मदतीचा : शाळा जवळ करण्यासाठी' हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. या कष्टांमुळे अनेकदा मुलांची शिक्षणातील गोडी कमी होते. तुमची एक जुनी सायकल या मुलांना केवळ शाळेपर्यंत पोहोचवणार नाही, तर त्यांच्या भविष्याला नवी दिशा आणि प्रेरणा देईल.
सायकल भंगारमध्ये दिली तर दोन-तीनशे रुपये मिळतीलही, पण तीच सायकल एखाद्या गरजू विद्यार्थ्याला दिली, तर त्याचं आयुष्य बदलू शकतं, असं आवाहन 'टिम आरोग्यम'ने केलं आहे.
तुमची सायकल सुरक्षित हातात पोहोचणार.! तुमच्या मनात शंका असेल की दिलेल्या सायकलचा योग्य वापर होईल का? तर आरोग्यम फाउंडेशनने पारदर्शकतेची पूर्ण काळजी घेतली आहे.
तुमची सायकल गरजू विद्यार्थ्याला दिल्यानंतर त्याचा फोटो काढून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल. तुमच्या दानामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले, हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल.
कधी व कुठे जमा करायची सायकल?
आरोग्यम फाउंडेशनचे स्वयंसेवक स्वतः तुमच्या घरी येऊन सायकल संकलित करणार आहेत.
- दिनांक : रविवार, ८ फेब्रुवारी २०२६
- काय करावे ? : आपल्याकडील सायकल देण्यासाठी ९२७२७४००३७ या क्रमांकावर कॉल करून आपले नाव आणि पत्ता नोंदवावा.
- विशेष सुविधा : आरोग्यमची टीम सायकल घेण्यासाठी तुमच्या घरी येईल. ज्यांना शक्य आहे ते स्वतः नेऊनही देऊ शकतात.
आवाहन : शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, पण परिस्थितीमुळे तो हक्क हिरावला जाऊ नये ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. चला तर मग, आरोग्यम फाउंडेशनच्या या कार्यात सहभागी होऊया आणि वस्तीवरील चिमुकल्यांचे शाळेचे अंतर कमी करूया. अधिक माहितीसाठी संपर्क : ९२७२७४००३७

