येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
नाशिक (ॲड. उमेश अनपट) : घर (Home) खरेदी केल्यानंतर आपला मालकीहक्क कायदेशीररित्या सिद्ध करणारा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे कन्क्व्हेयन्स डीड. मात्र आजही अनेक गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटमध्ये (Apartment) हा दस्तऐवज तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरमालकांच्या मालकीहक्कावर प्रश्नचिन्ह (Question) निर्माण होत असून भविष्यात कायदेशीर अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.
भारतात बहुतांश ठिकाणी फ्लॅटधारकांनी (Flat Holders) पैसे भरूनही जमीन आणि इमारतीचा पूर्ण मालकीहक्क त्यांच्या नावे येत नाही. बिल्डर केवळ बांधकाम (Construction) करून फ्लॅट विकतो, मात्र कन्क्व्हेयन्स न केल्यास जमीन व इमारत त्याच्याच नावावर राहते. कन्क्व्हेयन्स डीड?, त्याची गरज?, फायदे ? आदि सर्वसामान्य नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विधीतज्ञ ॲड. उमेश अनपट यांनी अगदी सोप्या भाषेत दिली आहेत.
1) कन्क्व्हेयन्स डीड म्हणजे काय? : कन्क्व्हेयन्स डीड म्हणजे बिल्डरकडील जमीन आणि इमारतीचा मालकीहक्क सोसायटी (Housing Society) किंवा अपार्टमेंट असोसिएशनच्या (Apartment Association) नावावर अधिकृतपणे हस्तांतरित करणारा कायदेशीर दस्तऐवज.
2) घर खरेदी केल्यावर आपोआप मालकी मिळत नाही का? : नाही. फ्लॅटची खरेदी केल्याने फक्त फ्लॅटचा वापराचा हक्क मिळतो. जमीन व संपूर्ण इमारतीचा मालकीहक्क मिळण्यासाठी कन्क्व्हेयन्स डीड आवश्यक असतो.
3) कन्क्व्हेयन्स नसेल तर काय धोका आहे?
- पुनर्विकास करता येत नाही
- बिल्डरचा हस्तक्षेप सुरू राहू शकतो
- बँक कर्ज (Bank Loan), विक्री किंवा वारसाहक्कात अडचणी येतात
- पार्किंग (Parking), ओपन स्पेसवर (Open Space) वाद निर्माण होऊ शकतात
4) कन्क्व्हेयन्स कोण करतो? : बिल्डरनेच सोसायटी किंवा अपार्टमेंटच्या नावावर कन्क्व्हेयन्स करून द्यायचा असतो. मात्र अनेक वेळा बिल्डर (Builder) टाळाटाळ करतो.
5) बिल्डर कन्क्व्हेयन्स करत नसेल तर काय करावे? : अशा वेळी सोसायटी एकतर्फी (Deemed) कन्क्व्हेयन्स करू शकते. यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे (DDR) आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो.
6) Deemed कन्क्व्हेयन्स म्हणजे काय? : बिल्डर सहकार्य करत नसेल, तर सरकारी कायद्याअंतर्गत सोसायटी स्वतः कन्क्व्हेयन्स करून घेऊ शकते, यालाच Deemed कन्क्व्हेयन्स म्हणतात.
7) सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये फरक काय?
- सोसायटी : जमीन व इमारत सोसायटीच्या नावावर असते
- अपार्टमेंट : प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र युनिट असतो, पण जमिनीवर सर्वांचा अविभाज्य हक्क असतो
8) अपार्टमेंटमध्येही कन्क्व्हेयन्स आवश्यक आहे का? होय. अपार्टमेंट असोसिएशनची नोंदणी (Registration) व डीड ऑफ डिक्लेरेशन झाल्यानंतर कन्क्व्हेयन्स अत्यावश्यक आहे.
9) कन्क्व्हेयन्स झाल्याचे कसे ओळखावे?
- सोसायटीच्या नावावर नोंदणीकृत कन्क्व्हेयन्स डीड आहे का ते तपासा
- 7/12, प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आहे का पाहा
- नोंदणी कार्यालयात माहिती मिळते
10) कन्क्व्हेयन्स झाल्यानंतर काय फायदे होतात?
- पूर्ण कायदेशीर मालकी मिळते
- पुनर्विकासाचा अधिकार मिळतो
- बिल्डरचा हस्तक्षेप थांबतो
- मालमत्तेची किंमत वाढते
- भविष्यातील वाद टाळता येतात

