शेवगाव (अहिल्यानगर) - परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करता येते, हे शेवगाव (Shevgoan) येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलचा (Balasaheb Bharde Highscool) माजी विद्यार्थी अक्षय लक्ष्मण शित्रे (Akshay Laxman Shitre) याने सिद्ध केले आहे.
अक्षयने नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत कठीण मानली जाणारी 'नेट-जेआरएफ' (NET-JRF) परीक्षा वाणिज्य शाखेतून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत (NET Exam) यश मिळवणारा तो शेवगाव व पंचक्रोशीतील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
अक्षय हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. घरची आर्थिक ओढाताण असतानाही त्याने डगमगून न जाता आपले शिक्षण सुरू ठेवले. विशेष म्हणजे, आजच्या स्पर्धेच्या युगात कोणतीही महागडी खाजगी शिकवणी (Tution) न लावता त्याने केवळ स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर हे राष्ट्रीय यश प्राप्त केले आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेत देशभरातून वाणिज्य शाखेचे तब्बल ७८ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी केवळ २९९ विद्यार्थीच 'जेआरएफ'साठी (JRF) पात्र ठरले आहेत. त्यात अक्षयने स्थान मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व संस्थेच्या वतीने अक्षयचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी हरीश भारदे यांच्या हस्ते त्याचा गौरव केला. यावेळी भारदे यांनी अक्षयच्या चिकाटीचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणास्थान (Idol) असल्याचे सांगितले.
या सत्कार प्रसंगी प्रा. संजय कुलकर्णी, सदाशिव काटेकर, प्रा. नितीन मालानी तसेच अक्षयचे वडील लक्ष्मण शित्रे उपस्थित होते. अक्षयच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
