येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या 'बदाम गँग'चा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी या आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण १० लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मळईवस्ती (चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी) येथील फिर्यादी दगडू भीमराज बडे हे १८ मार्च २०२६ रोजी आपल्या पत्नीसह घरात झोपलेले होते.
रात्री १ वाजेच्या सुमारास सहा अनोळखी इसमांनी घराचा कडाकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपींनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत व कपाटातील दागिने असा १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार बदाम काडू काळे याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने मजले चिंचोली (ता. अहिल्यानगर) येथील संजय आव्हाड यांच्या वस्तीवर छापा टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक केलेले आरोपी :
- बदाम कडू काळे (रा. शिरोडी, जि. छ. संभाजीनगर)
- साईनाथ विष्णू चव्हाण (रा. मुडदे वडगाव, जि. छ. संभाजीनगर)
- ऋतिक हसमुख चव्हाण (रा. खोसपुरी, अहिल्यानगर)
- महेश उर्फ उमेश नंदू काळे (रा. खोसपुरी, अहिल्यानगर)
- भैय्या कडू काळे (रा. शेकटा, अहिल्यानगर)
- लाकर करमत काळे (रा. शेकटा, जि. छ. संभाजीनगर)
- संजय भागचंद आव्हाड (रा. मजले चिंचोली) याला आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केली आहे.
तसेच या गुन्ह्यातील ताराचंद भोसले, बोट्या भोसले आणि तिरंगा काळे हे तीन आरोपी सध्या फरार आहेत. या आरोपींच्या सखोल चौकशीतून शेवगाव, नेवासा, सोनई आणि राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण १० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. यात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
हस्तगत केलेला मुद्देमाल :
- सोन्याचे दागिने : १० लाख २५ हजार रुपये (६९ ग्रॅम)
- मोबाईल : ४६ हजार रुपये (६ नग)
- शस्त्रे : चाकू, गलोर, लोखंडी कत्ती, कटावणी आणि भाला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

