आष्टी (बीड) - आष्टी (Aashti) तालुक्यातील ज्येष्ठ नेते, जुन्या पिढीतील नामवंत पैलवान, वारकरी संप्रदायाचे पाईक, भारुड सम्राट, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती हभप ईश्वर रामभाऊ गव्हाणे (Pailvan Ishwar Gavhane) (वय ७८, रा. बोरोडी ता. आष्टी, जि. बीड) यांचे निधन झाले.
शुक्रवार (दि. २०) पहाटे अहिल्यानगर येथे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी बोरोडी (Borodi) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मिरजगाव (Mirajgaon) पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूराव गव्हाणे, माजी सरपंच प्रमोद गव्हाणे,भाजपाचे लोणी गटाचे युवा नेते जयसिंग गव्हाणे, बोरोडीचे सरपंच (Sarpanch) बाळासाहेब गव्हाणे यांचे ते वडील होत.
पै. ईश्वर गव्हाणे हे 'आण्णा' नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांचे कुस्ती क्षेत्रात मोठे नाव होते. अहिल्यानगर, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे जिल्ह्यात त्यांच्या नावाचा दबदबा होता.
स्व. पैलवान छबुराव लांडगे (Pailvan Chhaburao Landge), सहादू गुंजाळ, अण्णा वामन, पै. अली चाऊस, युसुफ पैलवान, पै. रामभाऊ जगताप अशा नामवंत पैलवान बरोबर त्यांच्या कुस्त्या झाल्या होत्या. कर्जत श्रीगोंदा, पारनेर, आष्टी, जामखेड या तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये हगाम्यात अण्णांची कुस्ती झाली होती.
कुस्त्यांच्या आखाड्याबरोबरच राजकारणाचा आखाडाही त्यांनी चांगलाच गाजवला. सलग १५ वर्ष ते गावचे सरपंच राहिले. त्या काळामध्ये आमदार भीमराव धोंडे (MLA Bhimrao Dhonde) यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
कडा (Kada) कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद ही त्यांनी भूषविले. राजकारणाबरोबरच वारकरी संप्रदायातही अण्णांचा चांगलाच वावर होता. आषाढी दिंडी सोहळा, आळंदी दिंडी सोहळा, नाथ षष्ठी सोहळा अशा सर्व सोहळ्यामध्ये अण्णा अग्रेसर होते.
भारुड (Bharud) हा कलाप्रकार त्यांनी गावोगाव पोहोचविला. चार ते पाच तालुक्यामधील गावांमध्ये सप्ताहात अण्णांनी नाथांचे भारूड सादर केले म्हणून त्यांना भारुड सम्राट असे म्हटले जायचे.
रामायण (Ramayan) सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. लक्ष्मणाला शक्ती लागली हा प्रसंग सांगताना संपूर्ण श्रोत्यांना रडू कोसळत होते, अशी ओघवती शैली अण्णांची होती. त्यांची संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा होती. त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी मराठवाडा भूषण आष्टी-पाटोदा -शिरूर मतदार संघाचे आमदार सुरेश आण्णा धस, माजी आमदार भीमराव धोंडे, ज्येष्ठ नेते देविदास आबा धस, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव दरेकर, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हनुमंत थोरवे, उपस्थित होते.
तसेच अहिल्यानगर महापालिकेचे नगरसेवक कुमार वाकळे, श्रीगोंदा तालुका भाजपाचे अध्यक्ष बाळासाहेब महाडिक, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बलभीम शेळके, ह.भ.प राऊत, ह.भ.प रक्ताटे महाराज, अण्णासाहेब चौधरी, हे उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ दरेकर, दत्तात्रय वाडेकर आदींसह परिसरातील गावाचे सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थेचे चेअरमन, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
