अहिल्यानगर - जिल्ह्यात एकीकडे गॅस (Gas Cylinder) टंचाईचे सावट असतानाच, दुसरीकडे मानवी जिवाशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारामध्ये चक्क तीन गॅस टँकरमधून (Gas Tanker) अवैधरित्या गॅस चोरी आणि रिफिलिंग (Refeeling) करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.
या धडक कारवाईत पोलिसांनी २ कोटी १ लाख ९ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ४ आरोपींना बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत.
कामरगाव (Kamargaon) शिवारातील 'हॉटेल रेणुका दही मिसळ'च्या पार्किंगमध्ये (Parking) काही टँकरमधून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक (LCB PI) किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून धाड टाकली.
यावेळी पोलिसांना जे दृश्य दिसले ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता, कोणत्याही परवान्याशिवाय 'जुगाड' करून टँकरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील चार आरोपींना ताब्यात घेतले आहे:
- सचिन आबा बोधले (वय ३१, रा. धाराशिव)
- माणिक बालाजी गुट्टे (वय ३२, रा. बीड)
- उल्हास जीवन कवडे (वय ३२, रा. धाराशिव)
- अमृत बाळासाहेब ठोकळ (वय ३३, रा. कामरगाव)
या कारवाईत पोलिसांनी केवळ गुन्हेगारांनाच पकडले नाही, तर मोठा साठाही जप्त केला आहे.
- ३ महाकाय गॅस टँकर : किंमत १ कोटी ६५ लाख रुपये.
- ५७.२०० टन गॅस : किंमत ३० लाख ४८ हजार ५२८ रुपये.
- भारत गॅसच्या टाक्या व टेम्पो : ५ लाख ६० हजार रुपये.
- रिफिलिंगचे साहित्य : लोखंडी पाने, नोजल पाईप आणि इतर उपकरणे.
मोठ्या स्फोटाची भीती टळली : हे आरोपी एच.पी. कंपनीच्या टँकरमधून भारत गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत होते. अत्यंत ज्वलनशील पदार्थ असतानाही कोणतीही खबरदारी न घेता हे काम सुरू होते. एखादी ठिणगी जरी उडाली असती, तरी महामार्गावर मोठा अनर्थ घडला असता. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घातला होता.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७, २८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा, एलपीजी नियमन आदेश आणि स्फोटके अधिनियमांतर्गत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक समीर अभंग आणि त्यांच्या पथकाने (लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे) यशस्वी केली.
