'बुवा तिथे बाई' हे समीकरण (Equation) आजचे नाही, तर ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. पूर्वीच्या काळी शिक्षणाचा अभाव होता, त्यामुळे समाजात, विशेषतः महिलांमध्ये अंधश्रद्धेचे (Superstition) प्रमाण जास्त होते. 'चूल आणि मूल' हीच स्त्रियांची ओळख असल्याने बाहेरील जगाचे ज्ञान त्यांना नसायचे.
परंतु, आजच्या विज्ञानयुगात जेव्हा स्वतःला उच्चशिक्षित समजणाऱ्या महिला आणि पुरुष भोंदूगिरीकडे वळतात, तेव्हा ही एक मोठी सामाजिक शोकांतिका (Social Failure) ठरते.
निमित्त आहे शिक्षणाचा मुखवटा (Mask) आणि अंधश्रद्धेचा चेहरा समोर आल्याचे. नुकतेच नाशिकमध्ये उघडकीस आलेले मर्चंट नेव्हीचा कॅप्टन अशोक खरात (Captain Ashok Kharat) याचे प्रकरण समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे.
एक सुशिक्षित माणूस भोंदूगिरीचे दुकान थाटतो आणि आश्चर्य म्हणजे, त्याच्याकडे रांगा लावणारे 'गिऱ्हाईक' (Customer) हे समाजातील उच्चभ्रू, श्रीमंत आणि उच्चशिक्षित लोक होते. यात केवळ महिलाच नव्हत्या, तर आपल्या पत्नीला त्या भोंदूच्या बंद केबिनमध्ये सोडून बाहेर वाट पाहणारे 'बिनडोक' पुरुषही तितकेच जबाबदार आहेत.
भोंदूगिरीचा अघोरी कळस : अशोक खरात स्वतःला कृष्णाचा अवतार (Lord Krushna) म्हणायचा आणि येणाऱ्या महिलांना 'राधा' (Radha) म्हणून त्यांचे शोषण करायचा. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा उच्चशिक्षित महिला आणि पुरुष त्याचे मूत्र 'शक्तीवर्धक औषध' म्हणून पिऊ लागले.
एका उच्चपदस्थ महिलेने तर या नराधमाच्या सांगण्यावरून स्वतःचे बोट कापून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी, मंत्री (Minister) आणि मोठे राजकारणी (Politician) तासनतास याच्या दारात ताटकळत उभे राहायचे.
जर समाजातील मार्गदर्शकच अशा अंधश्रद्धेच्या आहारी जात असतील, तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा ठेवावी? आणि या लोकांनीही विज्ञानाची साथ सोडून अघोरी मार्गाकडे का जावे?
आज वैद्यकीय क्षेत्राने इतकी प्रगती केली आहे की, मूलबाळ होत नसेल तर तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञांकडे (Gynecologist) जाऊन उपचार घेणे शक्य आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी कष्टाची आणि नियोजनाची जोड आवश्यक असते.
असे असताना अंगारा-धुपारा, खडे-अंगठ्या किंवा भविष्य पाहणाऱ्यांकडे धाव घेणे कितपत योग्य आहे? महिलांनो, आता तरी जाग्या व्हा! आजही अनेक चुकीच्या प्रथांचे समर्थन करण्यात दुर्दैवाने महिलांचा मोठा वाटा दिसतो.
घरात अडचण आली की कष्टाचा मार्ग निवडण्याऐवजी भोंदू बाबांच्या (Baba) नादी लागून अनेकजणी स्वतःची अब्रू आणि पैसा दोन्ही गमावत आहेत. आपल्या महापुरुषांनी शिक्षणाची दारे उघडी केली ती वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, नराधमांच्या पाया पडण्यासाठी नव्हे.
परिस्थिती सुधारण्यासाठी केवळ देवाची किंवा बाबांची प्रार्थना करून चालत नाही, तर त्याला प्रामाणिक कष्टाची जोड द्यावी लागते. झगमगाटाच्या आणि दिखाऊ आयुष्याच्या मागे न लागता आपल्या मुला-मुलींना चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे.
थोडक्यात सांगायचे तर :
- वैद्यकीय समस्यांसाठी : डॉक्टरांचा सल्ला घ्या, भोंदू बाबांचा नाही.
- आर्थिक समस्यांसाठी : कष्ट करा आणि अनावश्यक गरजा कमी करा.
- सामाजिक भान : कोणत्याही बाबावर अंधश्रद्धेपोटी विश्वास ठेवण्यापूर्वी विवेकाने विचार करा.
बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या या विळख्यातून बाहेर पडल्याशिवाय आपल्या समाजाची आणि कुटुंबाची प्रगती होणे अशक्य आहे. वेळीच सावध व्हा, अन्यथा तुमची हीच चूक तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करू शकते.
- सौ. आशा सुधीर साठे
(सैनिकपत्नी, अहिल्यानगर)
