अहिल्यानगर - पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त (Force to commit suicide) केल्याप्रकरणी आरोपी पती मिरीमयी निहार मृधा (वय ३५ वर्षे, मूळ रा. घेरा, जि. गडचिरोली; सध्या रा. वनराई कॉलनी, नवनागापूर) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांनी दोषी ठरवून ७ वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा (Conviction) सुनावली आहे.
मिरीमयी मृधा याचे २०१४ मध्ये बबिता मृधा हिच्याशी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. आरोपी हा एमआयडीसी (MIDC) अहिल्यानगर भागात नोकरीस होता. मात्र, तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Dought) घेऊन तिला वारंवार मारहाण करत असे.
जुलै २०२३ मध्ये हा छळ पराकोटीला पोहोचला होता. आरोपीने पत्नीला (Wife) लोखंडी रॉडने मारहाण करणे, जबरदस्तीने दारू पाजणे, जेवण न देता तिचे डोके भिंतीवर आपटणे आणि केस उपटणे असे अमानुष अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून अखेर दि. २८ जुलै २०२३ रोजी बबिता यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
न्यायालयाचा निकाल : या प्रकरणी मृत बबिता यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश वसंतराव दिवाणे (Adv Mangesh Diwane) यांनी काम पाहिले.
त्यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. ज्यामध्ये मृत महिलेचा मुलगा, वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि तपास अधिकारी यांचा साक्षपुरावा महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला..
या कलमांन्वये शिक्षा सुनावली :
- भारतीय दंड विधान कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) : ७ वर्षे सक्तमजुरी आणि २०० रुपये दंड.
- कलम ४९८ (क्रूरता) : ३ वर्षे सक्तमजुरी आणि १०० रुपये दंड.
- कलम २०१ व ३२३ : प्रत्येकी १ वर्ष सक्तमजुरी आणि दंड.
या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगायच्या आहेत. या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) हंडाळ, दीपक पाठक तसेच मपोका (WPC) यशांजली जपकर व स्वाती गुंजाळ यांनी तपासात सहकार्य केले.

