सोनईत खळबळ ! कॅनलवर दबा धरून बसलेला सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी कट्टा व काडतुसे जप्त


अहिल्यानगर - अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध नगर पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामवाडी शिवारात सापळा रचून पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. 

त्याच्याकडून एक गावठी कट्टा (Pistol) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (DSP) अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक सोनई परिसरात गस्तीवर होते.

दिनांक २६ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अमोल रावसाहेब विटनोर (वय २७, रा. मांजरी, ता. राहुरी) हा तरुण सोनई ते खेडले परमानंद रस्त्यावरील श्रीरामवाडी परिसरात कॅनलजवळ बेकायदेशीर शस्त्र (Illegal Weapon) घेऊन थांबला आहे.

पथकाने तत्काळ तेथे जाऊन अमोल विटनोर याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

प्राथमिक चौकशीत हे शस्त्र त्याने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, अमोल विटनोर हा सोनई पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार (Absconded) होता. या कारवाईमुळे एका सराईत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक (PSI) अनंत सालगुडे, पोलीस बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, सायबर पोलीस स्टेशनचे दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर यांच्या पथकाने यशस्वी केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !