श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर होमहवन, कुमारिका पूजनाने नवरात्रोत्सवाचा मंगलमय समारोप


पाथर्डी (अहिल्यानगर) - श्रीक्षेत्र मोहटादेवीगड (Mohata Devi) येथे अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या वासंतीक (चैत्र) नवरात्र महोत्सवाची शुक्रवारी होमहवन आणि कुमारिका पूजनाने सांगता झाली. यावेळी सकल भारतीयांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.


विविध धार्मिक विधींचे आयोजन : महोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे आणि अॅड. ऋतीका कराळे यांच्या हस्ते मुख्य होमहवन विधी पार पडला.

या नऊ दिवसांच्या काळात शांतीपाठ, महासंकल्प, पुण्याहवाचन, चंडीयाग हवन, चौसष्ठ योगिनी दशमहाविद्या, अष्टभैरव पूजन तसेच अभिषेक व षोडशोपचार पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

भाविकांची मांदियाळी : वासंतीक नवरात्र हे आत्मशुद्धी आणि नवीन संकल्पांचे प्रतीक मानले जाते. महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. "सर्व देवीभक्तांना उत्तम आरोग्य, धनधान्य आणि सुख लाभो," असा महासंकल्प यावेळी सोडण्यात आला.

वस्त्रदान आणि समाजसेवा : या सोहळ्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड (किवळे) येथील उद्योजक व देवीभक्त चंद्रशेखर कातळे आणि नगरसेविका रेश्मा बापूजी कातळे यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. रेणुका विद्यालयातील विद्यार्थिनींना वस्त्रदान करून कुमारिका पूजन व अन्नदानही करण्यात आले.

उपस्थित मान्यवर : या कार्यक्रमास देवस्थानचे विश्वस्त अॅड. विक्रम वाडेकर (Adv Vikram Wadekar), बाळूशेट लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, लता दहिफळे, योगिता दहिफळे, कावेरी लाहोटी, पूजा वाडेकर, संतोष शर्मा, प्रसाद कुलट यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पौरोहित्य वे. नारायण सुलाखे, वे. भूषण देवा, वे. निखिल सुलाखे, महेश झेंड, विशाल किडे, शुभम जोशी, सिद्धेश्वर रामदासी, विशाल सुलाखे आणि भगवान जोशी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने केले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !