मोठी कारवाई ! तोतयागिरी करून लूटमार करणारी टोळी गजाआड


पुणे - बँकेचे कार्ड (Bank Card) चोरल्याचा बनाव रचून नागरिकांना धमकावून लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा बाणेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.


दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी आणि त्यांचे सहकारी सुतारवाडी (Sutarwadi) येथील साई रेसिडेन्सीसमोरून पायी जात होते. यावेळी दोन काळ्या रंगाच्या स्कूटरवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.

तुम्ही आमचे बँकेचे कार्ड घेतले आहे, आम्हाला तुमची झडती घेऊ द्या, असे म्हणून आरोपींनी फिर्यादींना धमकावले. जबरदस्तीने झडती घेण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील ४० हजार रुपये रोख काढून घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात (Baner Police Station) गुन्हा दाखल झाला होता.

अशी झाली अटक : गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळावरील आणि परिसरातील तब्बल ७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज (CCTV Footage) तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी पिंपरी परिसरातील मिलिंदनगर येथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी पिंपरीमध्ये राहणारे आहेत. त्यांची नावे अशी :
  1. दिनेश बाळू मंडपे (वय ३३)
  2. रोहन रमेश सूर्यवंशी (वय ३१)
  3. लक्ष्मण कृष्णा वाल्हेकर (वय ४६)
  4. संतोष राम कंपा (वय ३१)

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपआयुक्त चुलुमुल रजनीकांत व सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, सहाय्यक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव आणि त्यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रस्त्याने चालताना कोणाही अनोळखी व्यक्तीने अडवून झडती घेण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !