तीव्र टंचाई ! पाथर्डीफाटा-दामोदर नगरमध्ये पाण्यावाचून हाहाकार; नागरिकांचा संताप शिगेला

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

नाशिक - Nashik Municipal Corporationच्या हद्दीतील दामोदर नगर सह पाथर्डी फाटा परिसरात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. नळांना पाणी येणे पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

पालिकेकडून पुरवण्यात येणारी टँकर सेवा पूर्णपणे अपुरी आणि निष्क्रिय ठरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. टँकरसाठी देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिलांचा संताप उफाळला असून स्थानिक महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला जाब विचारला आहे.

आम्ही रोज पाण्यासाठी भटकत आहोत. लहान मुलांना पाणी मिळत नाही, घरकाम थांबलंय. पालिका आमचं ऐकतच नाही. आम्ही जगायचं कसं? — सौ. कविता शिंदे, स्थानिक रहिवासी

आठ- आठ दिवसांपासून सतत संपर्क साधूनही कोणतीही मदत मिळाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, खाजगी टँकरवाले मात्र पैसे देणाऱ्यांनाच पाणी पुरवत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

फोन लावला तरी कोणी उचलत नाही, मेसेज केला तरी प्रतिसाद नाही. आम्ही करदाते आहोत, मग आमच्याकडे दुर्लक्ष का? आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. — सौ. आशा लवांडे, स्थानिक रहिवासी

नागरिकांचा इशारा : आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार : “पाण्यावाचून जगण्यापेक्षा पालिकेसमोर आंदोलन करणे भाग पडेल का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नाशिकसारख्या धरणांनी समृद्ध शहरात अशी परिस्थिती निर्माण होणे धक्कादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रशासन मौनात, प्रश्न अनुत्तरित : शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी नेमकी कोणाची? टँकर व्यवस्था का अपयशी ठरत आहे? नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

आता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुधारावी, अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !