येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - जिल्ह्यातील विविध प्रकरणांत तक्रारदारांना न्याय मिळावा आणि पोलीस कामकाजात अधिक पारदर्शकता यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी रविवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ‘जन आक्रोश धरणे आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील काही प्रकरणांमध्ये पीडितांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जात नसल्याची पक्षाची भावना आहे.
विशेषतः गंभीर स्वरूपाच्या तक्रारींमध्ये केवळ अदखलपात्र (NC) गुन्ह्यांची नोंद करणे, तपासात विलंब होणे आणि काही ठिकाणी पीडितांवरच प्रति-गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा पक्षाने केला आहे. या तांत्रिक बाबींमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :
- गेल्या सहा महिन्यांतील 'NC' प्रकरणांची फेरपपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांचे एफआयआरमध्ये रूपांतर करावे.
- कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार घटकांवर प्रशासकीय चौकशीअंती कारवाई व्हावी.
- पीडितांवरील कथित खोटे गुन्हे रद्द करण्याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी.
- विविध गुन्ह्यांतील फरार आरोपींना पकडण्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून द्यावी.
पोलीस प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत अधिकृत आणि लेखी भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची मागणी आहे. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष चोळके यांनी घेतला आहे.
प्रमुख उपस्थिती : या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव आणि राज्य प्रवक्ते उत्कर्षाताई रुपवते उपस्थित राहणार आहेत. यावेळी आयोजित बैठकीला जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, मनोज साळवे, ऑगस्टीन गजभिव, विनायक गडाख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाही मार्गाने होत असलेल्या या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहनही पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

