शेवगाव (अहिल्यानगर) - सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता समाज परिवर्तनासाठी कसा करता येतो, याचा आदर्श रीलस्टार सिद्धेश लोकरे (Reelstar Siddhesh Lokare) याने घालून दिला आहे.
त्याच्या 'मिशन ३०३०३' अंतर्गत शेवगाव (Shevgaon) येथील भापकर वस्ती जिल्हा परिषद शाळेला (Bhalkar Vasti ZP School) दोन लाख रुपये किमतीचे दोन 'इंटरअॅक्टिव्ह पॅनल'(Interactive Pannel) भेट देण्यात आले आहेत.
या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण घेऊ शकणार आहेत. ३० दिवसांत राज्यातील ३० शाळांपर्यंत पोहोचून त्यांना ३० कोटी रुपयांची मदत मिळवून देण्याचा अनोखा आणि ध्येयवेडा संकल्प सिद्धेश लोकरे याने केला आहे.
आपल्या या मोहिमेसाठी सिद्धेश कधी सायकलवर तर कधी चक्क पायी प्रवास करून शाळांच्या समस्या जाणून घेत आहे. 'क्रिएट टूगेदर फाउंडेशन' (Create Together Foundation) च्या माध्यमातून आणि आपले सहकारी दीपक विश्वकर्मा व सौरभ सिंग यांच्या साथीने तो दानशूर व्यक्तींना या कार्याशी जोडून घेत आहे.
भापकर वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची दारे खुली व्हावीत, यासाठी पालक प्रतिनिधी व क्रीडा प्रशिक्षक प्रशांत लबडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच सिद्धेश लोकरे यांनी या शाळेची निवड करून ही अनमोल भेट दिली.
मुख्याध्यापक आरती तागडे व सहशिक्षिका श्रीकांता शिंदे यांनी या उपक्रमाची माहिती देत सिद्धेश लोकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष रोहिदास बोडखे, उपाध्यक्ष अमोल गिर्जे, सदस्य संतोष रुईकर, प्रवीण टेकाळे, निलेश निकते आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ आणि केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सिद्धेश लोकरे व त्यांच्या टीमचे आभार मानले. शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. रिल्सच्या माध्यमातून समाजसेवेचा हा नवा 'ट्रेंड' (Trend) सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
