शेवगाव (अहिल्यानगर) - तालुक्यातील प्रगतशील शेतकरी इरफान काझी (Irfan Kazi) यांचा राज्य आंबा उत्पादक संघातर्फे कृषी क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. हा सोहळा मुंबईत नुकताच पार पडला.
मुंबई विद्यापीठ येथे आयोजित एकदिवसीय कृषी परिषदेत रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT) मुंबईचे कुलपती पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी (Dr. J B Joshi) आणि कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित (Aniruddha Pandit) यांच्या हस्ते काझी यांना सन्मानित करण्यात आले.
इरफान काझी यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर केला आहे. प्रामुख्याने सोलर यंत्रणा (Solar System), ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि जैविक खतांचा (Biofertilizer) वापर करून त्यांनी शेती व्यवसायाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे.
बदलत्या हवामानाचे (Climate Change) आव्हान पेलत त्यांनी शेतीमध्ये राबवलेले नवनवीन प्रयोग आणि घेतलेले दर्जेदार उत्पादन, यामुळे त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांचे हे प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही अनुकरणीय ठरले आहेत.
या विशेष सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, बापूसाहेब भोसले, एजाज काझी, हरीश भारदे, डॉ. ओंकार रसाळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. काझी यांच्या या यशामुळे शेवगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, कृषी क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
