येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी मनुस्मृतीबाबत केलेल्या एका विधानाचा अहिल्यानगरमध्ये विविध संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करत निषेध नोंदवला.
येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा
आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक अभिवादन करून करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला परिसर दणाणून सोडला होता.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे (Yogesh Sathe) यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक विचारातून पावले उचलली, त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही. मनुस्मृतीमधील विचार हे विषमतेचे प्रतीक असून त्याचे समर्थन करणे चुकीचे आहे.
त्यांनी इशारा दिला की, संबंधित वक्तव्याबाबत माफी न मागितल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलने केली जातील. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी प्रशासनाला आवाहन केले की, समाजात तेढ निर्माण होईल अशा वक्तव्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
शहराध्यक्ष दीपक पाटोळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करत ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करूनच भाष्य करण्याचा सल्ला दिला. हे आंदोलन योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे योगेश क्षीरसागर, राजीव भिंगारदिवे, मनोज साळवे, अमर निर्भावाने, संदीप वाघमारे उपस्थित होते. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दीपक पाटोळे, गोरख केदारे, रवींद्र कांबळे, दीपक गायकवाड, वसंत मेघदंबर, मोहन शिरसाठ, गौतम पाचारणे, अविनाश राक्षे, युवराज बनसोड, राहुल कांबळे, राहुल पडागळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

