काळाची हाक ! संस्कारांची शिदोरी आणि आधुनिक 'जिजाऊ'ची गरज


आजच्या २१ व्या शतकात महिला उच्चशिक्षित होऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत. आर्थिक स्वावलंबन आणि करिअरमधील प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, या चकाकीच्या युगात डोकावताना एक विदारक वास्तवही समोर येत आहे.


वाढती महागाई आणि गरजांमुळे पती-पत्नी दोघांनीही कमावणे आजची गरज बनली असली, तरी या धावपळीत आपल्या चिमुरड्यांकडे आणि कुटुंबव्यवस्थेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

संस्कारांचा पाया आणि आईची साथ : मुले म्हणजे मातीचा गोळा, त्यांना जसा आकार देऊ तशी मूर्ती घडते. सध्याचा काळ अत्यंत आव्हानात्मक आणि काहीसा भयानक आहे. अशा काळात मुलांना केवळ भौतिक सोयीसुविधा नको आहेत, तर त्यांना आई-वडिलांच्या सहवासाची आणि संस्कारांची जास्त गरज आहे.

राजमाता जिजाऊंनी शिवबांना जे संस्कार दिले, त्यामुळेच स्वराज्य निर्माण होऊ शकले. आजच्या 'आधुनिक जिजाऊ'लाही हीच भूमिका बजावावी लागणार आहे. मुलांचे बालपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवण्यापेक्षा, त्यांना वाचनालयाची गोडी लावणे आणि मैदानी खेळांकडे वळवणे ही काळाची गरज आहे.

आज समाजात विकृत घटनांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः आपल्या कोवळ्या कळ्यांना (मुलींना) सुरक्षित ठेवण्यासाठी आईचे 'डोळ्यात तेल घालून' लक्ष असणे गरजेचे आहे. मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी त्यातील नकारात्मक गोष्टी मुलांच्या कोवळ्या मनावर खोलवर परिणाम करत आहेत.

मुलांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे म्हणजे त्यांचे भविष्य उध्वस्त करण्यासारखे आहे. पालकांशी होणारा संवाद कमी झाल्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

हल्ली कुटुंब विखुरण्याचे मुख्य कारण म्हणजे 'मीपणा' आणि एकमेकांचा सन्मान न करणे. पैसा भरपूर आला की अहंकारही वाढतो. पती-पत्नीमधील मतभेद चार भिंतींच्या आत सुटण्याऐवजी कोर्टाची पायरी चढण्यापर्यंत मजल जाते, ज्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो.

त्यामुळे अहंकार सोडून संवाद साधा. कारण, कुटुंबात तडजोड आणि एकमेकांचा आदर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरुषांनीही स्त्रियांचा सन्मान राखायला हवा, तरच घराला घरपण लाभेल.

आजी-आजोबांचे महत्त्व आणि आर्थिक नियोजन : आजच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुले एकाकी पडत आहेत. खरं तर, प्रत्येक घरात मुलांवर लक्ष ठेवणारे आणि गोष्टी सांगणारे आजी-आजोबा असायलाच हवेत. घरातील अनावश्यक गरजा कमी करून आणि अचूक आर्थिक नियोजन करून जर आपण मुलांना वेळ दिला, तर भविष्यातील एक सुसंस्कृत पिढी आपण घडवू शकतो.

माणूस माणसाशी बोलेनासा झाला आहे. पैसा येतोय, पण माणसं कमी होत आहेत. जर प्रत्येकाने आपले कुटुंब सुसंस्कृत घडवण्यासाठी प्रयत्न केले, तर समाज आपोआपच सुसंस्कृत होईल. कुटुंबाचा पाया हा संवाद आणि संस्कारांवर उभा असतो, तो टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

- सौ. आशा सुधीर साठे 
(सैनिकपत्नी, अहिल्यानगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !