आजच्या धावपळीच्या युगात मानवी जीवनशैली आणि विचारांमध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे. पूर्वीच्या पिढीचे संयमी जीवन आणि आजच्या तरुणाईचे 'बिंदास' जगणे यामध्ये मोठी दरी (Generation Gap) पडली आहे.
आजची तरुण पिढी उच्चशिक्षित झाली आहे, मोठ्या कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पॅकेजवर काम करत आहे; पण प्रश्न उरतो तो म्हणजे, हे तरुण खरंच तणावमुक्त जीवन (Tension Free Life) जगत आहेत का? याचे उत्तर दुर्दैवाने 'नाही' असेच मिळते.
पैसा आणि सुखाच्या हव्यासापोटी ही मुले स्वतःहून तणाव (Stress) ओढवून घेत आहेत. शिक्षण किंवा नोकरीनिमित्त शहरात राहणारी अनेक मुले-मुली सध्या एका नव्या प्रवाहाकडे ओढली जात आहेत, तो म्हणजे 'लिव्ह-इन रिलेशनशिप' (Live in Relationship).
लग्नाआधी एकमेकांचा स्वभाव जाणून घेण्याच्या नावाखाली, घरच्यांना न जुमानता आणि समाजाचा धाक न बाळगता एकत्र राहण्याचे हे फॅड (Trend) सध्या फोफावत आहे. काही पालकांना तर आपल्या मुलांच्या अशा वागण्याबद्दल पुसटशी कल्पनाही नसते.
संवादाचा अभाव आणि टोकाची पावले : हे 'उच्चशिक्षित' जोडपे (Couple) एकमेकांच्या स्वभावाची माहिती मिळवण्यासाठी एकत्र तर येतात, पण जेव्हा मतभेद सुरू होतात, तेव्हा तडजोड करण्याची वृत्ती मात्र त्यांच्यात नसते. एकमेकांपासून अलिप्त होण्याच्या वादातून अनेकदा हिंसाचार जन्म घेतो.
अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, जिथे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या मुलीची तिच्या जोडीदारानेच क्रूरपणे हत्या (Murder) केली. ज्या मुलीला आई-वडिलांनी मोठ्या प्रेमाने वाढवले, तिचे आयुष्य एका अनोळखी व्यक्तीने अशा प्रकारे संपवणे ही समाजासाठी चिंतेची बाब आहे.
मुलींनो, सावध व्हा ! तुम्ही कितीही उच्चशिक्षित झालात किंवा स्वबळावर कमवू लागलात, तरी आई-वडिलांच्या अनुभवाचा विचार करा. त्यांनी पाहिलेले जग आणि त्यांची अनुभवाची शिदोरी तुमच्यापेक्षा मोठी आहे. त्यांचे निर्णय तुमच्यासाठी कधीही चुकीचे नसतील.
पालकांचा मान राखा : आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना एकदा आई-वडिलांना (Parents) विचारून पहा. ते तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतील. प्रेमप्रकरणातील सुरुवातीचा गोडवा कालांतराने संपू शकतो. घाईघाईने घेतलेले निर्णय आणि पळून जाऊन केलेले लग्न अनेकदा पश्चातापाचे कारण ठरते.
संस्कारांची जाणीव ठेवा : ज्या मुली आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि आई-वडिलांच्या संस्कारांची जपणूक करतात, त्या कधीही चुकीच्या मार्गाला लागत नाहीत.
पालकांची जबाबदारी : मुले बाहेरगावी शिकायला किंवा कामाला असताना पालकांनीही सतर्क (Alert) राहणे गरजेचे आहे. आपली मुलगी कुठे राहते, कोणासोबत राहते, याकडे लक्ष दिले पाहिजे.
अधूनमधून कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना भेटायला गेल्याने मुलांवर एक मानसिक धाक राहतो आणि ते चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचू शकतात. शिक्षण आणि पैसा यासोबतच नैतिक मूल्ये आणि संस्कारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे.
'लिव्ह-इन' सारख्या तात्पुरत्या सुखाच्या मागे लागून आपले अनमोल आयुष्य मातीमोल करू नका. शेवटी, आई-वडिलांचे प्रेम आणि त्यांनी दिलेले संस्कार हेच आयुष्याचे खरे संचित आहे.
- सौ. आशा सुधीर साठे
(माजी सैनिक पत्नी, अहिल्यानगर)
