मोठी बातमी ! विमानाचे इंधन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असतानाच, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) विमान इंधनाचा (ATF) काळाबाजार उघडकीस आणला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तब्बल ८८ लाख ५८ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


(हे YouTube चॅनल Subscribe करा)

५ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गव्हाणवाडी येथील हॉटेल महाराजाच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विमानाचे इंधन चोरून साठवले जात आहे.

या माहितीची खातरजमा करून उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) प्रवीण लोखंडे यांच्या उपस्थितीत पथकाने तात्काळ छापा टाकला. यावेळी इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून (MH-04-LQ-6865) तीन इसम बेकायदेशीरपणे इंधन काढताना रंगेहात सापडले.

या कारवाईत पोलिसांनी १) मुकेश रामअकबाल सिंग (वय २६, रा. उत्तर प्रदेश), २) रामभवन रामतिरथ राजपूत (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) आणि ३) चंदू शिवराम जांभळकर (वय ४१, रा. गव्हाणवाडी, श्रीगोंदा) यांना ताब्यात घेतले आहे. टँकरचे सील तोडून हे इंधन (Oil) विक्रीसाठी साठवले जात होते.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हरीष भिमसिंग (रा. पिंपरी, पुणे) हा असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून २८,००० लिटर आणि १२,००० लिटर क्षमतेचे ATF इंधन, एक टाटा कंपनीचा टँकर, इंधन काढण्याचे इंजिन आणि लोखंडी ड्रम्स असा एकूण ८८.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यासह स्फोटके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक (DSP) सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक (Additional SP) वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

येथे क्लिक करुन इन्स्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !