अहिल्यानगर - राज्यातील पोलीस दलात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) पुरस्कार अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार श्री. राजू आप्पासाहेब सुद्रिक (Raju Sudrik) यांना प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या सुवर्ण यशामुळे जिल्हा पोलीस (Police) दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन २०२५ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह घोषित झाले. यात राज्यातील ८०० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.
श्री. राजू सुद्रिक यांनी अहिल्यानगर पोलीस दलात गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांचा उल्लेखनीय सेवा अभिलेख, उत्तम प्रशासकीय कार्यक्षमता आणि कर्तव्याप्रती असलेली प्रबळ निष्ठा लक्षात घेऊन त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांकडून कौतुक : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी पत्राद्वारे सुद्रिक यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 'आपल्या या उत्तम कामगिरीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी पार पाडाल, अशी मला खात्री आणि आशा आहे', अशा शब्दांत घार्गे यांनी सुद्रिक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
श्री. राजू सुद्रिक (बॅच नं. ३४५) हे सध्या अहिल्यानगर येथील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि नागरिकांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.
'खाकी'ची शान वाढवणाऱ्या या पुरस्कारामुळे अहिल्यानगर पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
