अहिल्यानगर - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yog Day) नवी दिल्लीत अहिल्यानगर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावणारी एक अभिमानास्पद घटना घडली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेतकरी कन्या प्रियंका बापूराव शिंदे (Priyanka Shinde) हिने भारताचे परराष्ट्रमंत्री (Foreign Minister) एस. जयशंकर यांच्यासह जगातील अनेक देशांच्या राजदूतांना आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना योगाचे मार्गदर्शन केले.
नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील नेहरू पार्क (Neharu Park) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विशेष कार्यक्रमात विविध देशांचे राजदूत आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून देत, प्रियंकाने विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले आणि त्यांच्याकडून योगसाधना करून घेतली.
प्रियंका ही 'नॅशनल योगा चॅम्पियन' असून तिने अत्यंत कमी वयातच योग क्षेत्रात देशभरात मोठे नाव कमावले आहे. सध्या ती दिल्ली येथे देशातील एकमेव सरकारी योग संस्था असलेल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय महाविद्यालयात योगाचे उच्च शिक्षण घेत आहे.
या महाविद्यालयामार्फत तिने यापूर्वी संसद भवन आणि अनेक सरकारी संस्थांमध्ये योग प्रात्यक्षिके सादर केली आहेत. देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर योग सादर करण्याची संधी मिळणे, हा महाराष्ट्रासाठी मोठा बहुमान मानला जात आहे.
लेकीच्या या यशावर तिचे वडील बापूराव शिंदे यांनी अत्यंत भावूक होत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आमच्या कुटुंबाला योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने स्वबळावर मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे.
आज तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय, ही माझ्यासाठी 'जागतिक पितृदिनाची' सर्वोत्तम भेट आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल प्रियंकावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
