सकारात्मकतेची 'एक ज्योत': राष्ट्रीय प्रोत्साहन दिनानिमित्त विशेष चिंतन | National Encouragement Day


प्रोत्साहन म्हणजे नेमके काय? सोप्या शब्दांत सांगायचे तर, दुसऱ्याला दोन गोड शब्द बोलून किंवा लिहून दिलासा देणे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणे.


समाजातील मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारावे आणि लोकांमध्ये सकारात्मकता (Positivity) वाढीस लागावी, या उदात्त उद्देशाने अमेरिकेतील आर्कान्सा (Arkansas) राज्याच्या राज्यपालांनी १२ सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय प्रोत्साहन दिन' म्हणून घोषित केला.

त्यानंतर तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश (George W. Bush) यांनीही समाजात परस्परांना आधार देण्याची भावना वाढीस लागावी म्हणून या उपक्रमाला पाठिंबा दिला.

'द लास्ट लीफ' आणि आशेचा किरण : या दिवसाचे औचित्य साधताना ओ. हेन्री (O. Henry) यांची जगातील अत्यंत प्रसिद्ध कथा “द लास्ट लीफ” (The Last Leaf - शेवटचे पान) आठवल्याशिवाय राहत नाही. या कथेत जॉनसी (Johnsy) नावाची एक तरुण मुलगी गंभीर आजारी पडते.

तिची तब्येत दिवसेंदिवस खालावते. निराश झालेली जॉनसी खिडकीबाहेर दिसणाऱ्या आयव्हीच्या (Ivy) वेलीची गळणारी पाने मोजत बसते. "वेलीचे शेवटचे पान गळले की माझाही अंत होईल," अशी वेडी समजूत ती मनात करून घेते. तिची मैत्रीण सू (Sue) तिला धीर देण्याचा प्रयत्न करते.

त्यांच्या शेजारी बेहरमन (Behrman) नावाचा एक वृद्ध चित्रकार राहत असतो. जॉनसीची ही निराशा पाहून तो तिला नवी आशा देण्याचा निर्णय घेतो. एका वादळी रात्री वेलीचे शेवटचे खरे पान गळून पडते. परंतु, बेहरमन त्या कडाक्याच्या थंडीत आणि पावसात भिंतीवर हुबेहूब पानाचे चित्र रेखाटतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून ते पान पाहून जॉनसीच्या मनात पुन्हा जगण्याची जिद्द निर्माण होते आणि ती पूर्ण बरी होते. दुर्दैवाने, ते पान रंगवताना झालेल्या त्रासामुळे बेहरमन आजारी पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. पण त्याचा त्याग एका मुलीला नवजीवन देऊन जातो.

कधीकधी एखाद्याला जगण्याची आशा देणारी छोटीशी गोष्ट किंवा कौतुकाचे दोन शब्द (Words of Appreciation) त्याच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. त्यामुळे ट्रोलिंगच्या काळात 'सहृदयता' जोपासा.

आज सोशल मीडियाच्या (Social Media) युगात माणसे आभासी जगात जवळ आली असली, तरी 'ट्रोलर्स' (Trollers) नावाच्या प्रवृत्तीमुळे नकारात्मकता वाढली आहे. निष्कारण केली जाणारी टीका आणि टोमणे यामुळे काही जणांनी आत्महत्या केल्याच्याही दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

एखाद्याची कलाकृती किंवा लेख आवडला नाही, तरीही "छान प्रयत्न आहे, पुढील वेळी या चुका सुधारल्यास आणखी उत्तम होईल" असा सकारात्मक सल्ला (Constructive Feedback) आपण देऊ शकतो.

विशेषतः लहान मुलांना सतत प्रोत्साहित केल्यास त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो. चुका काढणे जगात सर्वात सोपे काम आहे; पण दुसऱ्याचे मनापासून कौतुक करण्यासाठी आपल्यातील सहृदय माणूस (Empathic Human) सतत जागा ठेवावा लागतो.

आजपासूनच स्वतःला आणि इतरांना "छान, मस्त, आवडले" असे म्हणून प्रोत्साहन देण्याची सवय लावूया. ही छोटीशी गोष्ट आपल्यालाही मनातून शांत आणि प्रसन्न ठेवेल. चला तर मग, या 'राष्ट्रीय प्रोत्साहन दिना'च्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकतेची ज्योत उजळवूया.!

स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !