पिठोरी अमावस्या हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो, त्यामागे एक रोचक गोष्ट आहे. फार पूर्वी एका आईची सात मुले बाहेर खेळता-खेळता घराच्या बाजूला असलेल्या जंगलात गेली. दुपार टळून संध्याकाळ झाली, तरी मुले घरी आली नाहीत.
घरात त्यांची वाट पाहत असलेल्या आईने संपूर्ण गाव पिंजून काढले, पण मुले काही सापडेना. तेव्हा तिला संशय आला की, कदाचित मुले खेळताना जंगलात गेली असावीत. ती मुलांना शोधायला जंगलात निघते, तोपर्यंत रात्र झालेली असते.
मुलांच्या काळजीने ती सातही मुलांच्या नावाने हाका मारायला लागते, पण मुलांचा काहीच शोध लागत नाही. ती अजून आत घनदाट जंगलात जाते; मुलांची काहीच चाहूल लागत नाही आणि पहाट व्हायला लागते. अजून पुढे जात-जात ती जंगलाच्या मध्यभागी असणाऱ्या तलावापाशी येते.
तलावाच्या जवळ जाताना पायाशी काहीतरी लागून ती खाली पडते. पाहते तर तिची सातही छोटी मुले निपचिप पडलेली असतात. ती त्यांना हाका मारून उठवायला जाते, परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. सातही मुलांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला असतो.
आपली मुले मृत्यूमुखी पडलेली पाहून ती आई दुःखाने वेडीपिसी होते. टाहो फोडून रडायला लागते, तिचा आवाज जंगलातली शांतता चिरत फिरत राहतो. हे दुःख सहन न होऊन ती त्या तलावात जीव द्यायला जाते, त्याचवेळी तिथल्या उगवलेल्या तेरड्यातून पार्वती देवी बाहेर पडते! तीच ही पिठोरी (Mother Goddess).
आईचा विलाप ऐकून, तिचे दुःख पाहून देवीने सातही मुलांना जिवंत केले आणि पुन्हा सगळी मुले तिच्या पदरात टाकली. मुले पुन्हा मिळून आनंदी झालेल्या आईने देवीचे पाय धरले आणि आपल्या मुलांना कायम सुरक्षित ठेव, असं वरदान मागितलं!
पिठोरी अमावस्येचे सांस्कृतिक महत्त्व : आता आपण याच गोष्टीची दुसरी बाजू बघू. ज्या दिवशी ही घटना घडली, तो दिवस होता अमावस्या (New Moon Day). पावसाळा संपत आलेला आणि श्रावणातला निसर्ग बहरलेला. या दिवसात वेगवेगळ्या रंगाची तेरड्याची रोपटी सगळीकडे उगवतात आणि सहज मिळतात.
या दिवशी देवी पार्वतीची पूजा करताना तिला तेरड्याच्या स्वरूपात पूजतात. मांडायला सोपी आणि निसर्गातूनच मिळणारी ही रोपटी म्हणजे अगदी बिनखर्चिक होणारी पूजा (Eco-friendly Worship) होय.
आई आपल्या मुलांना या पूजेत वाण देताना आपल्या मुलांना मागे उभे करते. यात नैवेद्याचे ताट आई आपल्या डोक्यावर ठेवते आणि मागे उभे असणारे तिचे अपत्य त्या ताटाला हात लावून आईच्या प्रश्नांना उत्तरे देतात. शतकांपासून हे प्रश्न आणि उत्तरे एकच आहेत:
आई विचारते : "माझ्या मागे कोण आहे?"
अपत्य (मुलगा किंवा मुलगी) म्हणतो/म्हणते : "मी आहे."
अर्थ : नेहमी आईच्या म्हणजेच कुटुंबाच्या मागे आणि सोबत राहावे.
पुढे आई सांगते : "जवळ असशील तर हात दे, लांब असशील तर साथ दे."
अर्थ : वार्धक्याला जेव्हा आईचा हात थरथरेल, तेव्हा-तेव्हा आईला तू आधार दे, तिला एकटं टाकू नकोस. पुढे जर तुला कामानिमित्त लांब जावं लागलं, तरी आपल्या आईला साथ दे! आत्ताच्या काळाला तर हे वाक्य फार तंतोतंत लागू पडतं.
वाण देताना पुढले वाक्य आहे, "कोल्हापूरची वाट कोणती?" तेव्हा अपत्य म्हणतो, "हीच." याचा अर्थ असा की, आईने देखील मुलांना योग्य मार्ग दाखवावा, योग्य दिशा दाखवावा आणि मुलांनी देखील योग्य मार्ग ओळखून त्यावर चालावे. मार्ग चुकवून चुकीच्या मार्गाला लागून संकटात सापडू नये, याचंच प्रतीक म्हणून कोल्हापूरची वाट सांगितली जाते.
जीवनाचा खरा बोध : तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक, तुमचा विश्वास असो की अविश्वास; पण या गोष्टीत जो बोध (Moral) आहे, तो शेवटी महत्त्वाचा आहे.
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः!
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया !!
(अर्थात: मातेसारखी सावली नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही. मातेसारखे रक्षण नाही, मातेइतकं प्रिय कुणीही नाही.)
सर्व देवकी आणि यशोदासम असलेल्या सर्व मातांना निरोगी आणि आरोग्यदायी आयुष्याच्या शुभेच्छा.
या लोककथा आपल्याला नात्यांचे महत्त्व सांगतात. मी बाबांना नेहमी विचारायचे, या कथा कोणी निर्माण केल्या असतील? बाबा म्हणत, समाजाला दिशा देण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी या कथा निर्माण केल्या असाव्यात; पण नंतर यात कर्मकांड आणि अंधश्रद्धा घुसल्याने आपण मूळ हेतू आणि गाभा (Core Essence) यापासून दूर गेलो आहोत.
म्हणून आपल्या संस्कृतीचे हे मूळ निसर्गप्रेम (Nature Love) आपण जपायला हवे. यातूनच मुले जिव्हाळ्याचा आणि माणसात राहण्याचा धडा शिकतील. तेरड्यातून निर्माण झालेली पार्वती म्हणजे काय, निसर्गालाच देव मानूया, हीच शिकवण नाही का? आपण विवेकाने या सर्वांकडे पाहायला शिकायला हवे, असे मला वैयक्तिक वाटते. मंडळी, तुमचे काय मत आहे?
©® स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
(माझ्या 'पदार्थ, पर्यावरण आणि आपले सण' या पुस्तकातून साभार)

.jpg)