मुंबई - राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधीतांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या योजनेच्या माध्यमातून कोरोना काळात कर्करोग, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या तब्बल १ लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. खासगी रुग्णालयात १८ हजार २२८ तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात २७७८ असे एकूण १ लाख २१ हजार ९९१ रुग्णांवर उपचार झाले आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सामान्य रुग्णांना जीवनदायी ठरत असून मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे या योजनेमुळे शक्य झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने दि. २३ मे रोजी या योजनेची व्याप्ती नव्याने वाढवली.
या योजनेसंदर्भात तसेच नजिकच्या सहभागी रुग्णालयांविषयी अधिक माहितीसाठी योजनेच्या २४ X७ सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी कले आहे.