अहमदनगर - जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक, शिक्षक, प्रशासकीय सेवक व विदयार्थ्यांनी कोरोना विरोधी लढयासाठी मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीला रुपये ५१ लाख रुपयांची मदत दिली. हा धनादेश निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्याकडे जमा केला.
राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रेरणेने ही संस्था १०१ वर्षापूर्वी स्थापन झाली असून २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. हे औचित्य साधून ५१ लाख रूपये मदत निधीचे संकलन केले होते. संस्थेने स्थापनेपासून शाहू महाराजांच्या विचारानुसार सामाजिक बांधीलकी जपली आहे.
भूकंप, महापूर व इतर राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी संस्थेने नेहमीच मदत केली आहे, अशा भावना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी मदत देते वेळी व्यक्त केल्या. कोविड-१९ या महामारीमुळे उदभवलेल्या संकटाला सामोरे जाणेसाठी संस्थेत शिकणा-या ७५ हजार विदयार्थ्यांना संस्था मास्क व सॅनिटायझर पुरवणार असल्याचे संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी सांगितले.
संस्थेमध्ये शिकणारे गरीब विदयार्थी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू व अंध विदयार्थी यांना संस्था नेहमीच मदत करते अशा भावना संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे यांनी व्यक्त केल्या. निवासी जिल्हाधिकारी निचीत म्हणाले की, संस्थेने आपत्ती काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेली मदत अतिशय उपयोगी आहे.
मोठा निधी संस्थेने मदत म्हणून दिला आहे. मी संस्थेच्या उपक्रम व कारभार याबाबत अनेक वर्षापासून ऐकत होतो. आज मात्र संस्थेच्या पदाधिका-यांना भेटण्याचा प्रत्यक्ष योग आला याचा मला खूप आनंद होत आहे, असेही निचित यावेळी म्हणाले.