• लॉकडाऊन काळातील दरवाढ रद्द करा
• वीज बिले माफ करण्याची मागणी
अहमदनगर - कोरोना लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून वीज बिले माफ करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.
आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, आयटकचे जिल्हा सचिव सुधीर टोकेकर, विडी कामगार नेते शंकर न्यालपेल्ली, भैरवनाथ वाकळे, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, संतोष गायकवाड, विजय केदारे, अंबादास दौंड, चंद्रकांत माळी, रविंद्र वाबळे, महादेव कोलते आदि पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महावितरणने कोरोना लॉकडाऊन काळातील रीडिंग न घेता तीन महिन्याचे सरसकट सरासरी वाढीव रकमेची वीज बिले नागरिकांना पाठवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कोरोनाच्या संकट काळात हवालदिल झाले असून, वीज बिलामध्ये मोठी तफावत असलेल्या जादा रकमेचे वीज बिल ते भरू शकत नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहे. अनेकांनी नोकर्या गमावल्या आहेत.
मुलांच्या शिक्षणासह दैनंदिन खर्च भागवणे दुरापास्त झाले आहेत. अशा दुप्पट-तिप्पट रकमेची वीज बिले आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढीव बिलाबाबत महावितरणकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. रीडिंग न घेता दिलेली वीज बिले अन्यायकारक असून, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ग्राहकांची लुबाडणूक सुरु असल्याचा आरोप कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.
अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढीचा निषेध नोंदवून, महावितरणाने दिलेली जादा रकमेची वीज बिले मागे घेऊन सरकारने या काळातील बिले माफ करण्याची मागणी केली आहे. मागणीचे निवेदन डिव्हिजन अकाऊंट विभागाचे अजय म्याना यांना देऊन या प्रश्नासंदर्भात चर्चा केली.