चाईल्डलाईनने रोखले तीन बालविवाह

अहमदनगर -  लॉकडाऊनमध्ये बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी चाईल्डलाईन संस्थेसह, पोलिस, महिला बालविकास, बाल संरक्षण कक्ष यांनी पाथर्डी व नगर शहरात होणारे आणखी तीन बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.


पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी या गावातील एक व नगर शहरात दोन बालविवाह रोखण्यात आले. याची गोपनीय माहिती चाईल्डलाईन संस्थेला १०९८ या मोफत क्रमांकावर मिळाली होती. चाईल्डलाईनच्या टीमने ताबडतोब पाथर्डी पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती कळवली. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल कल्याण समिती, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांनाही सविस्तर माहिती दिली.

पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. बाबर, कॉन्स्टेबल गर्जे व महिला होमगार्ड यांनी  घटनास्थळी जाऊन ग्रामसेवक गीता सांगळे व सरपंच सुरेखा फुंदे यांच्या मदतीने हा बालविवाह थांबवला. मुलगी व मुलाचे पालक आणि सहभागी असलेले नागरिक यांना पाथर्डी पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तेथे त्यांना बालविवाह प्रतिबंधक २००६ कायद्याची समज देऊन अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीचे लग्न लावणार नाही, असा लेखी जबाब घेतला.

बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाळासाहेब साळवे, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, समुदेशक अलिम पठाण, टीम मेंबर शाहिद शेख, अब्दुल खान, प्रविण कदम, पूजा पोपळघट, यांनी ही कामगिरी केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !